नायगावच्या बीडीडी चाळीतील रहिवासी चालले ५०० चौरस फुटांच्या घरात, चावी वाटप पुढील आठवड्यात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 14:41 IST2025-11-05T14:40:47+5:302025-11-05T14:41:26+5:30
‘भाडे वाढवून द्या’; नायगावमधील रहिवाशांची मागणी

नायगावच्या बीडीडी चाळीतील रहिवासी चालले ५०० चौरस फुटांच्या घरात, चावी वाटप पुढील आठवड्यात!
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: दादर येथील नायगावच्या बीडीडी चाळीतील १६० चौरस फुटांच्या घरांत राहणाऱ्या रहिवाशांना आता ५०० चौरस फुटांचे घर मिळणार आहे. येथील बीडीडी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यातील पाच इमारती तयार झाल्या असून, ८६४ घरांचे चावी वाटप पुढील आठवड्यात होणार आहे. वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे. वरळीमधील चावी वाटपाच्या कार्यक्रमानंतर नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील घरांकडेही रहिवाशांचे लक्ष लागले आहे.
नायगावमधील पुनर्विकासाचे काम एल ॲण्ड टी कंपनीतर्फे सुरू आहे. म्हाडाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील इमारतींना अग्निशमन दलाचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळाले आहे. दरम्यान, नायगाव येथील ४२ चाळींचा पुनर्विकास केला जाईल. तीन हजार ३४४ रहिवाशांचे पुनर्वसन २३ मजल्यांच्या २० इमारतींमध्ये केले जाईल. येथील काम दोन टप्प्यांत सुरू आहे. पहिल्या टप्प्यात आठ, तर दुसऱ्या टप्प्यात १२ इमारती बांधल्या जाणार आहेत.
३४२ जणांना डिसेंबरपर्यंत ताबा
ना. म. जोशी मार्ग, बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्याचे काम वेगात सुरू असून, डिसेंबरमध्ये ३४२ रहिवाशांना त्यांच्या स्वप्नातील घर मिळणार आहे. पहिल्या टप्प्याच्या इमारतीचे काम सुरू आहे. सातपैकी दोन इमारतींमधील ३४२ रहिवाशांना येत्या डिसेंबरपर्यंत ताबा देण्यात येईल. उर्वरित पाच विंगमधील रहिवाशांना मार्च २०२६ नंतर टप्प्याटप्प्याने ताबा दिला जाईल.
‘भाडे वाढवून द्या’
नायगावमधील रहिवाशांना दर महिन्याला २५ हजार रुपये भाडे मिळत आहे. परंतु, त्यांनी ते वाढवून मागितले आहे. वाढीव भाड्याबाबत आता काहीच सांगता येणार नाही, असे म्हाडाकडून सांगण्यात आले.
...या पूर्वीच काढली लॉटरी
पहिल्या टप्प्यात १,४०१ घरे उभारली जाणार होती. यापैकी ८६४ घरांचे चावी वाटप केले जाईल. या घरांची लॉटरी यापूर्वीच काढण्यात आली आहे, असे म्हाडाकडून सांगण्यात आले.