Join us
Daily Top 2Weekly Top 5

कांदळवन पक्ष्यांसाठी राखीव ठेवा; पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्राला अद्याप उत्तर नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 06:21 IST

फेब्रुवारीत पाठवलेल्या पत्राला अद्याप उत्तर नाही

मुंबई : कांदिवली पूर्वेकडील चारकोप सेक्टर आठ, म्हाडा वसाहती जवळील कांदळवन विभाग आणि चारकोप तलाव व गार्डन परिसरामध्ये विविध प्रजातींच्या पक्ष्यांचा अधिवास दिसून येतो. त्यामुळे हा परिसर पक्ष्यांसाठी राखीव ठेवा, असे पत्र पंतप्रधानांना पाठवण्यात आले आहे. मात्र, हे पत्र ७ फेब्रुवारी रोजी पाठविण्यात आले असून त्याचे अद्याप उत्तर आलेले नाही. त्यामुळे पर्यावरणप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.पर्यावरणप्रेमी मिली शेट्टी म्हणाल्या की, काळी पाणकोंबडी, भारद्वाज, चित्रबलाक, सुगरण, वेडा राघू, स्वर्गीय नर्तक, दयाळ, खंड्या, राखी बगळा, तांबट, काळ्या डोक्याची मनोली, मोठा पाणकावळा इत्यादी पक्ष्यांचा अधिवास आहे. कांदळवनाचा मोठा भाग असल्यामुळे पक्ष्यांना राहण्यासाठी पोषक वातावरण आणि खाद्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते, त्यामुळे पक्ष्यांचा वावर वाढत आहे.सध्या कांदळवनामध्ये अतिक्रमण वाढू लागले असून, प्लास्टीक आणि इतर कचरा टाकला जातो. त्यामुळे काही पक्ष्यांच्या प्रजाती दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होऊ लागल्या आहेत. चारकोप सेक्टर आठमधील परिसर पक्ष्यांच्या अधिवासासाठी राखीव ठेवा, असे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिण्यात आले आहे, परंतु फेब्रुवारीत लिहिलेल्या पत्राचे उत्तर अद्याप मिळाले नाही.चारकोप सेक्टर आठ येथील स्थानिक रहिवासी दर रविवारी चारकोप तलाव व कांदळवन भागात स्वच्छता मोहीम राबवित होते. मात्र, पावसाळ्यात या मोहिमेमध्ये खंड पडला. दरम्यान, कित्येक किलो कचरा गोळा करण्यात आला असून, अद्याप कचºयाची समस्या सुटत नाही. नागरिक प्लास्टीक कचरा व पूजेचे साहित्य कांदळवन परिसरात तसेच तलावात टाकतात. त्यामुळे तलावामध्ये कचºयाचा थर जमा होतो. त्याचा परिणाम पक्ष्यांच्या अधिवासावर होत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये विकासकामे सुरू असून, त्यांचा सर्वात मोठा परिणाम पक्ष्यांच्या राहणीमानावर होतोय, असेही पर्यावरणप्रेमींनी सांगितले. मॅन्युअल फर्नांडिस यांनी पक्ष्यांची बरीच माहिती जमा केली आहे.

टॅग्स :नरेंद्र मोदी