न्यू इंडिया बँक घोटाळ्याला रिझर्व्ह बँक जबाबदार : देशपांडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 13:52 IST2025-03-18T13:51:20+5:302025-03-18T13:52:13+5:30
मुंबई ग्राहक पंचायत आणि चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर या शाळेचे संस्थापक विश्वस्त शिक्षण महर्षी अजय कौल यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंडिया सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या मार्गदर्शनार्थ जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती...

न्यू इंडिया बँक घोटाळ्याला रिझर्व्ह बँक जबाबदार : देशपांडे
मुंबई : न्यू इंडिया सहकारी बँकेत १२२ कोटींचा गैरव्यवहार झाल्याने रिझर्व्ह बँकेने बँकेतून पैसे काढण्यास ठेवीदारांना मज्जाव केला. मात्र, या बँकेच्या घोटाळ्याला प्रामुख्याने रिझर्व्ह बँक, केंद्र सरकार जबाबदार आहे, असा आरोप करत ठेवीदारांना त्यांच्या घामाचा पैसा परत मिळालाच पाहिजे, अशी अपेक्षा मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष ॲड. शिरीष देशपांडे यांनी शनिवारी वर्सोव्यात व्यक्त केली.
मुंबई ग्राहक पंचायत आणि चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर या शाळेचे संस्थापक विश्वस्त शिक्षण महर्षी अजय कौल यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंडिया सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या मार्गदर्शनार्थ जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी देशपांडे बोलत होते. यावेळी संस्थेच्या विधी मार्गदर्शक शर्मिला रानडे, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कुलकर्णी, चिल्ड्रन वेल्फेअर सेंटरचे ॲक्टिव्हिटी चेअरमन प्रशांत काशीद आणि ३०० ठेवीदार उपस्थित होते.
सामान्यांनी काय करावे?
संस्थेच्या विधी मार्गदर्शक रानडे यांनी सादरीकरण करून ठेवीदारांच्या ५ लाखांपर्यंतच्या ठेवी कशाप्रकारे मिळू शकतील, याचे सविस्तर मार्गदर्शन केले.
सहकारी बँकांतील घोटाळे नित्याचेच झाले आहेत. त्यांच्यावर आर्थिक क्षेत्रातील नियामकच न्यायबुद्धी हरवून बसले तर सामान्यांनी काय करायचे? असा सवाल ज्येष्ठ पत्रकार कुलकर्णी यांनी केला.
आठवी अटक
या घोटाळ्याशी संबंधित जावेद आझम याला आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी अटक केली. तो इलेक्ट्रिक उपकरणांचा वितरक आहे. अरुणाचलम याच्या चौकशीतून जावेदचे नाव पुढे येताच ही कारवाई करण्यात आली. जावेद हा अटक झालेला आठवा आरोपी आहे.