आरक्षणामुळे उमेदवारांची निश्चिती रखडली; पक्षांमध्येही अजून चर्चा सुरूच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 10:01 IST2025-12-25T10:01:03+5:302025-12-25T10:01:16+5:30
पालिका निवडणुकीसाठी २२७ पैकी १५ जागांवर अनुसूचित जातीच्या आणि दोन जागांवर अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी आरक्षण आहे.

आरक्षणामुळे उमेदवारांची निश्चिती रखडली; पक्षांमध्येही अजून चर्चा सुरूच...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महापालिकेचा निवडणुकीत १७ जागांवर अनुसूचित जाती आणि जमातीचे पडलेले आरक्षण तसेच काही राजकीय पक्षांमध्ये होत असलेल्या तसेच झालेल्या युती आणि आघाड्या, याचा परिणाम काही प्रभागांत उमेदवार निश्चित करण्यावर झाला आहे. जवळपास सर्वच पक्षांत ही स्थिती आहे.
पालिका निवडणुकीसाठी २२७ पैकी १५ जागांवर अनुसूचित जातीच्या आणि दोन जागांवर अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी आरक्षण आहे. त्यामुळे या आरक्षणामुळे राजकीय पक्षांची गणिते काहीशी बिघडली आहेत. या संबंधित प्रभागांत जे उमेदवार इच्छुक होते किंवा ज्या माजी नगरसेवकांची उमेदवारी कायम ठेवली जाणार होती, त्या ठिकाणी आरक्षणामुळे नवे चेहरे द्यावे लागतील.
नव्या चेहऱ्यांचा शोध सुरूच
पालिका निवडणुकीत २०१७ प्रमाणेच आरक्षण कायम राहील हा राजकीय पक्षांचा अंदाज चुकला आहे. आरक्षणामुळे तेथील प्रस्थापित खुल्या किंवा ओबीसी वर्गातील उमेदवार बदलणे आणि त्या ऐवजी आरक्षित प्रवर्गातील नवा उमेदवार देण्याचे नवे आव्हान राजकीय पक्षांपुढे आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत पर्यायी उमेदवार देण्यासाठी जोरदार हालचाली सुरू राहण्याची शक्यता आहे.