देशभरातील सर्व शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींना ‘नगरसेवक’ म्हटलं पाहिजे - खासदार रवींद्र वायकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 21:24 IST2025-07-04T21:23:48+5:302025-07-04T21:24:29+5:30
आपल्या देशाचे पंतप्रधान स्वतःला पंतप्रधान नाही तर जनतेचे सेवक समजतात. जर पंतप्रधान स्वतःला जनतेचा सेवक म्हणत असतील तर आम्हीपण जनतेचे सेवक आहोत. नगरसेवक ही व्याख्या तसेच बनवली पाहिजे, असे मत ही खासदार वायकर यावेळी व्यक्त केले.

देशभरातील सर्व शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींना ‘नगरसेवक’ म्हटलं पाहिजे - खासदार रवींद्र वायकर
मुंबई:सर्व देशांतील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींच्या पदांमध्ये एकसूत्रता आणण्यासाठी येथील लोकप्रतिनिधीना नगरसेवकच संबोधण्यात यावे, अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे शिंदे सेनेचे खासदार रवींद्र वायकर यांनी हरियाणा येथे पार पडलेल्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेत केली. हरियानातील मानेसर येथे स्वराज्य संस्थांची राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती.
आपल्या देशाचे पंतप्रधान स्वतःला पंतप्रधान नाही तर जनतेचे सेवक समजतात. जर पंतप्रधान स्वतःला जनतेचा सेवक म्हणत असतील तर आम्हीपण जनतेचे सेवक आहोत. नगरसेवक ही व्याख्या तसेच बनवली पाहिजे, असे मत ही खासदार वायकर यावेळी व्यक्त केले.
हरियाणातील मानेसर येथे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांची पहिली राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. देशभरातील महानगरपालिकांचे महापौर , आयुक्त या परिषदेला हजर होते. केंद्रीय शहर व गृहनिर्माण मंत्री मनोहरलाल खट्टर , लोकसभा अध्यक्ष ओम बिरला हजर होते.
बाळासाहेब ठाकरेंचा ‘नगरसेवक’ शब्द देशभरात वापरण्याची शिंदे सेनेची मागणी
महाराष्ट्रात , मुंबई, ठाण्यात ब्रिटिशकाळापासून महापालिका, नगरपालिका सदस्याला सिटीफादर म्हणजेच नगरपिता म्हणायचे. शिवसेना १९६७ साली ठाण्याच्या नगरपालिका निवडणुकीत उतरली. प्रचारादरम्यान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलं की, निवडून येणारा काय तुमचा बाप आहे का , त्याला पिता म्हणता ? तुम्ही त्याचे बाप आहात. आमचे सदस्य पिता नाही सेवक असतील. नगरसेवक असतील. पुढे हाच शब्द रूढ झाल्याची माहिती खा. वायकर यांनी दिली.