पूर्व द्रुतगती मार्गावरील ‘त्या’ ७०६ झाडांचा अहवाल द्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 12:32 IST2026-01-06T12:32:04+5:302026-01-06T12:32:04+5:30
हरित लवादाचे पालिकेला वृक्षतोडीप्रकरणी निर्देश

पूर्व द्रुतगती मार्गावरील ‘त्या’ ७०६ झाडांचा अहवाल द्या!
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : एमएमआरडीएच्या पूर्व मुक्त मार्गाच्या घाटकोपर ते ठाणे विस्तारीकरणासाठी पूर्व द्रुतगती मार्गावरील ७०६ झाडे कापली जाणार आहेत. याविरोधात पर्यावरणप्रेमींनी दाखल याचिकेवर हरित लवादासमोर सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान हरित लवादाने मुंबई महानगर पालिकेला ७०६ झाडांबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी २८ फेब्रुवारीला होईल.
घाटकोपर ते ठाणे या अंदाजे १३ किमीच्या लांबीच्या आणि ४० मीटर रुंदीच्या विस्तारीकरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यासाठी पूर्व द्रुतगती मार्गावरील ७०६ झाडांपैकी ३२० झाडे कापावी लागणार असून, ३८६ झाडांचे पुनर्रोपण करावे लागणार आहे. झाडे कापण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव एमएमआरडीएने पालिकेच्या उद्यान विभागाकडे सादर केला आहे. मात्र, या ७०६ झाडांच्या कत्तलीस पर्यावरणप्रेमी, स्थानिक आणि विविध संघटनांनी विरोध केला आहे.
उपस्थित केले प्रश्न
पूर्व द्रुतगती मार्गावरील हिरवळ नष्ट करून पर्यावरणाचा ऱ्हास करणारा असा ७०६ वृक्षतोडीचा निर्णय रद्द करण्याची मागणी त्यांच्याकडून होत आहे. मात्र, ही मागणी मान्य मान्य होत नसल्याने अखेर मुलुंडमधील ॲड. सागर देवरे यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये या वृक्षतोडीविरोधात हरित लवादात धाव घेऊन याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी झालेल्या सुनावणीदरम्यान किती झाडे कापली जाणार, झाडे कुठे पुनर्रोपित केली जाणार, वृक्षतोडीला काही पर्याय उपलब्ध आहे का याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश हरितलवादाने पालिकेला दिल्याची माहिती याचिकाकर्ते ॲड. देवरे यांनी दिली.
डिसेंबरमध्ये २३३ ठिकाणी कामबंद नोटीस
वायू प्रदूषणाच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर महिन्यात पालिकेकडून तब्बल २३३ विकासकामांना कामे थांबविण्याची नोटीस देण्यात आली. जिथे वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) २०० च्या वर जाईल तिथे ‘GRAP 4’ अंतर्गत बांधकामे थांबवू, असा इशारा पालिकेने दिला आहे. मुंबईत आतापर्यंत १,९५४ बांधकामांपैकी १,१०३ बांधकामांनी वायू गुणवत्ता मापन संयंत्रे संयंत्रे बसविली आहेत.
मुंबईत एकूण २८ वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्रे आहेत. त्यापैकी एमपीसीबीच्या अखत्यारीत १४ केंद्रे, भारतीय उष्णकटिबंधीय मौसम विज्ञान संस्थान, पुणे, अंतर्गत ९ केंद्रे आणि पालिकेच्या अखत्यारित ५ केंद्रे कार्यरत आहेत. ०१ ते ०२ जानेवारीदरम्यान मुंबईतील केंद्रनिहाय २४ तासांचा एक्यूआय समाधानकारक तर ३ व ४ जानेवारीला एक्यूआय मध्यम श्रेणीत होते.