मुंबई - सायन येथील आवर लेडी ऑफ गुड काउन्सिल या इंग्रजी शाळेची इमारत अनधिकृतपणे उभारल्याची तक्रार शिक्षण अधिकार कार्यकर्ते नितीन दळवी यांनी शिक्षण विभागाकडे केली होती. या पार्श्वभूमीवर विभागीय शिक्षण उपसंचालक राजेश कंकाळ यांनी पालिका शिक्षणाधिकाऱ्यांना शाळेची इमारत अधिकृत आहे की अनधिकृत, याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश २७ ऑक्टोबर २०२५ रोजी दिले आहेत.
दळवी यांनी २३ जानेवारी २०२५ रोजीच्या तक्रारीत म्हटले आहे की, शाळेची इमारत सिटी सर्व्हे नंबर १८ वर अनधिकृतपणे बांधली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या स्तरावर तातडीने चौकशीची मागणी केली होती. मात्र, शाळेच्या इमारतीची पाहणी करण्यासाठी निरीक्षकांनी शाळेला भेट दिली. यावेळी शाळेतील कागदपत्रांची त्यांनी पडताळणी केली. संबंधित शाळेच्या संदर्भात नोंदणीकृत वास्तुविशारद यांनी शालेय इमारतीचा आराखडा व त्यानंतर ना हरकत प्रमाणपत्र सर्व बाबी सादर केल्याचे १८ सप्टेंबर रोजीच्या महापालिका शिक्षणाधिकाऱ्यांच्या पत्रात केले आहे.
या तक्रारीच्या आधारे पत्राद्वारे पालिका शिक्षणाधिकाऱ्यांना शाळेची इमारत अनधिकृत आहे किंवा नाही, याची चौकशी करून सविस्तर लेखी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.- राजेश कंकाळ, विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई