सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम डिसेंबरमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 01:42 AM2019-11-16T01:42:57+5:302019-11-16T01:44:09+5:30

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने (एमएसआरडीसी) सायन पुलाच्या दुरुस्तीचे काम डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू करण्यात येणार आहे.

The repair work of the Sion Airport will be completed in December | सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम डिसेंबरमध्ये

सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम डिसेंबरमध्ये

Next

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने (एमएसआरडीसी) सायन पुलाच्या दुरुस्तीचे काम डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू करण्यात येणार आहे. यासाठी वाहतूक विभागाकडे प्रस्ताव दिला असून वाहतूक विभागाच्या निर्देशानुसार या मार्गावर वाहतुकीमध्ये बदल करून ब्लॉक घेण्यात येईल. तसेच कामास सुरुवात झाल्यावर ४५ दिवसांमध्ये हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे एमएसआरडीसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. या काळामध्ये वाहतूककोंडीला सामोरे जावे लागणार आहे.
सायन पुलाच्या दुरुस्तीपूर्व कामांना आता सुरुवात करण्यात आली आहे. या उड्डाणपुलाचे १७० बेअरिंग बदलण्याचे काम करण्यात येणार आहे. या उड्डाणपुलावरून अवजड वाहनांना डिसेंबर २०१८ पासून बंदी घातली आहे. आता दुरुस्तीचे काम सुरू झाल्यावर सर्वच वाहनांची उड्डाणपुलावरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. वाहतूक विभागाच्या वतीने वाहतुकीचा अभ्यास करून वाहतूक वळविण्याबाबत आणि ब्लॉक घेण्याबाबत एमएसआरडीसीला कळविण्यात येणार आहे. हे काम आधी १२ जॅकच्या साहाय्याने करण्यात येणार होते, मात्र यासाठी चार ते पाच महिन्यांचा कालावधी लागला असता. यामुळे आता हे काम शंभर जॅकच्या साहाय्याने करण्याचे ठरले आहे. अधिक संख्येने हवे असणारे जॅक उपलब्ध करण्यास वेळ लागत असल्याने दुरुस्तीचे काम सुरू होण्यास विलंब झाला.
२८ मार्च २०१९ ला या पुलाच्या स्लॅबच्या प्लास्टरचा १० बाय १५ सेंमीचा तुकडा कोसळल्यानंतर एप्रिलमध्ये दुरुस्तीचे काम त्वरित हाती घेण्यात येणार होते, पण तेही लांबले. नवी मुंबई आणि पूर्व उपनगरातून शहरामध्ये प्रवेश करणाºया हजारो वाहनांना या पुलाचा वापर करावा लागतो. या पुलाच्या दुरुस्तीच्या काळामध्ये सायन सर्कलमध्ये वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे.

Web Title: The repair work of the Sion Airport will be completed in December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.