Join us
Daily Top 2Weekly Top 5

६ डिसेंबरपूर्वी दादरचे नामांतर करा, भीम आर्मीचे रेल्वेमंत्री व मुख्यमंत्र्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 15:38 IST

येत्या ६ डिसेंबरपूर्वी नामांतरप्रश्नी निर्णय न घेतल्यास मुख्यमंत्र्यांना चैत्यभूमीवर पाय ठेवू देणार नाही असा इशारा देतानाच सहा डिसेंबर रोजी आंदोलन करण्यात  येणार असल्याचे  या संघटनेने म्हटले आहे.

मुंबई : राज्य आणि देशातील तमाम आंबेडकरवादी जनतेची मागणी असलेल्या दादर रेल्वे स्थानकाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस, असे नामांतर करावे अशी मागणी भीम आर्मी या सामाजिक संघटनेने रेल्वे मंत्री पियुष गोयल तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे  केली आहे.  येत्या ६ डिसेंबरपूर्वी नामांतरप्रश्नी निर्णय न घेतल्यास मुख्यमंत्र्यांना चैत्यभूमीवर पाय ठेवू देणार नाही असा इशारा देतानाच सहा डिसेंबर रोजी आंदोलन करण्यात  येणार असल्याचे  या संघटनेने म्हटले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उच्च विद्याविभूषित होते. म्हणूनच कोलंबिया विद्यापीठाने जगातील सर्वात विद्वानव्यक्ती म्हणून गौरव करीत त्यांचा पुतळा कोलंबिया विद्यापीठाबाहेर उभारला आहे . दादर या ठिकाणी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चैत्यभूमी आहे , त्यांचे निवासस्थान राजगृह तसेच आंबेडकरी चळवळीचे केंद्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनदेखील याच दादर परिसरात असल्याचे भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख अशोकभाऊ कांबळे व महासचिव सुनील थोरात  यांनी  म्हटले आहे.

केंद्र सरकारने दादर चैत्यभूमीजवळील इंदू मिल मध्ये भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला . मात्र अद्याप या सरकारने इंदू मिल मध्ये कामाची एक वीट देखील रचलेली नाही. मागील सरकारने केलेल्या कामाचे भूमिपूजन करण्याचे काम भाजप सरकार करीत आहे .अशी टीका भीम आर्मीने केली आहे . दादर स्थानकाचे नामांतर करण्यात यावे अशी मागणी देशातील तमाम जनतेने वारंवार केली आहे. ६ डिसेंबर रोजी देशविदेशातून करोडो आंबेडकरी अनुयायी चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी येत असतात . त्याचप्रमाणे प्रधानमंत्री, मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री  तसेच देशविदेशातील अतिमहत्वाच्या व्यक्तीदेखील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येतात, त्यामुळे दादर रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस असे रास्त नाव देण्यात यावे अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून देशविदेशातून होत आहे .

भीम आर्मीने मागील ६ डिसेंबर २०१७ व १४ एप्रिल २०१७ रोजी दादरचे प्रतीकात्मक नामांतर करून या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधले होते तसेच पत्रव्यवहारदेखील केला होता. यावेळी देखील रेल्वे प्रशासनामार्फत आला असून राज्यात ठिकठिकाणी स्टेशन मास्तर यांनी वेदने देण्यात आली आहेत. आता पुन्हा या प्रश्नावर तमाम जनतेच्या आदोलनाची वाट न पाहता जनतेच्या  मागणीचा केंद्र तसेच राज्य सरकारने सन्मान ठेवून येत्या ६ डिसेंबरपूर्वी यासंदर्भातील निर्णय घेण्यात यावा अशी विनंती कांबळे यांनी आपल्या निवेदनात केली आहे.

टॅग्स :दादर स्थानकमुंबई