लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: वरळी बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पातील ५५६ रहिवाशांना घरांच्या चाव्या देण्याची घोषणा करण्यात आली. प्रत्यक्षात मात्र २६ जणांनाच चाव्या मिळाल्याने रहिवाशांमध्ये नाराजी आहे. चावी घेण्यासाठी म्हाडाकडून सहा संच कागदपत्रांसह हमीपत्राची अट घालण्यात येत असून, त्याविरोधात उद्धवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत आवाज उठवला. बीडीडी चाळीतलेच रहिवासी असल्याने हमीपत्राची अट अन्यायकारक असून, ती तातडीने रद्द करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेल्या कार्यक्रमात १६ जणांना प्रातिनिधिक स्वरूपात चाव्या देण्यात आल्या. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी नव्या घरात गृहप्रवेश करण्याची रहिवाशांची अपेक्षा होती. मात्र, अटी-शर्तीमुळे प्रक्रिया गुंतागुंतीची झाली आहे. घर मिळाल्यावर सजावट व साहित्य हलवण्यासाठी किमान एक महिना आवश्यक असताना, केवळ १५ दिवसांची अट घालण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात अनेकजण गावी जात असल्याने मुदत वाढवून द्यावी, असे ठाकरे म्हणाले.
दोन बंधूंची ताकद दिसेल
दोन पक्ष, दोन भाऊ एकत्र येण्याच्या ताकदीचा धसका काहींनी घेतला आहे. दोन बंधूंच्या एकत्र येण्याची ताकद दिसेलच. बेस्ट पतपेढीची निवडणूक हा ट्रायल बॉल होता. तो तसाच खेळला. नियोजन पुढे-मागे झाले असेल. पण तेथे काही अंतर्गत फेरबदल होतील, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.