बेस्टचे बोधचिन्ह असलेल्या मिनीबस नाशिक-कसारा मार्गावर चालवण्यात येत असल्याचे वृत्त 'लोकमत'मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर बेस्ट प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार कंत्राट रद्द झालेल्या बसवरील बोधचिन्ह त्वरित हटवण्याची कार्यवाही बेस्ट प्रशासनाने सुरू केली असून संबंधित कंत्राटदारांना त्याबाबत कडक सूचना देण्यात आल्या आहेत.
केवळ मुंबईपुरत्याच मर्यादित असलेल्या बेस्टच्या गाड्या पश्चिम उपनगरात भाईंदरपर्यंत प्रवाशांना सेवा देते. पूर्व उपनगराच्या पुढे प्रवाशांसाठी बेस्टची सेवा बेलापूर, मुलुंडपर्यंत मिळते. मात्र, काही महिन्यांपूर्वीपासून बेस्टचे बोधचिन्ह असलेल्या गाड्या नाशिक-कसारा मार्गावर धावत असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे प्रवाशांसह नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र बेस्टच्या भाडेतत्त्वावरील गाड्या कंपनीचे कंत्राट रद्द झाल्यानंतर विविध ठिकाणी अनधिकृतपणे चालवल्या जात असल्याचे चौकशीनंतर स्पष्ट झाले. या कंपन्यांकडे वाहतुकीचा परवाना असल्यामुळे बेस्टचे बोधचिन्ह ठेवूनच गाड्या खासगीरित्या चालवल्या जात होत्या. त्यामुळे प्रशासनाने आता त्याची गंभीर दखल घेतली आहे.
मिनीबसमधील गैरप्रकार१. संबंधित कंत्राटदार कंपनीचे बेस्टशी असलेल्या कंत्राट ऑक्टोबर २०२४ मध्ये रद्द झाले होते. त्यानंतर कंत्राटदाराने आपल्या मिनी बसगाड्या बेस्ट आगारातून दुसऱ्या ठिकाणी नेण्यास सुरुवात केली. अशीच एक बस बेस्टच्या बोधचिन्हासह नाशिक मार्गावर दिसली असावी, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
२. ही बाब गंभीर असल्यामुळे या गाड्यांवरील बोधचिन्ह त्वरित हटवण्याची सूचना कंत्राटदाराला देण्यात आली आहे. तसेच असा गाड्यांवरील बोधचिन्ह हटवण्याची कार्यवाही तत्काळ सुरू करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
३०० बसगाड्या बेस्ट प्रशासनाने जप्त केल्या होत्या. कंत्राट रद्द केलेल्या कंपनीच्या मिनी बसेसवर जप्तीची कारवाई केल्यानंतर बेस्टने त्या सर्व गाड्या आणिक आगारात गेली दीड वर्ष उभ्या करुन ठेवल्या होत्या.
बेस्ट प्रशासनाकडे लेखोजोखा नाहीकरार रद्द झालेल्या कंत्राटदार कंपनीच्या ३०० बसगाड्या बेस्टच्या सेवेत होत्या. या बस जप्त करुन आणिक आगारात गेले दीड वर्ष ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, कंपनीला कर्ज देणाऱ्या वित्त संस्थांनी न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी न्यायालयाच्या निकालानंतर टप्प्याटप्प्याने गाड्या सोडवून नेल्या जात आहेत. या गाड्यांचे पुढे काय होते, याचा कोणताही लेखाजोखा बेस्ट प्रशासनाकडे नाही. त्यामुळे या गाड्या बोधचिन्ह न काढताच अनेक ठिकाणी वापरल्या जात असल्याचे सांगितले जात आहे.