Join us  

तानाजी सावंत याची शिवसेनेतून हकालपट्टी करा, सोलापूरच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 12:56 PM

नुकत्याच झालेल्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये तानाजी सावंत यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नव्हता, तेव्हापासून ते नाराज आहेत.

मुंबई - मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्या आणि स्थानिक राजकारणात पक्षाविरोधात उघड भूमिका घेणाऱ्या तानाजी सावंत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. एकीकडे तानाजी सावंत यांना मंत्रिपद देण्याची मागणी करणाऱे शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आता तानाजी सावंत यांचीही पक्षातून हकालपट्टी करा, अशी मागणी सोलापूरमधीलशिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी हे शिवसेना पदाधिकारी मातोश्रीवर दाखल झाले आहेत. नुकत्याच झालेल्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये तानाजी सावंत यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळे ते नाराज होते. त्यानंतर त्यांचे उद्धव ठाकरे यांच्यासोबत खटकेही उडाले होते. उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीत शिवसेनेचे नेते डॉ. तानाजी सावंत यांनी महाविकास आघाडीऐवजी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. तसेच शिवसेनेच्या एका बैठकीलाही ते अनुपस्थित राहिले होते. त्यामुळे सावंत यांच्याविरोधात पक्षामध्ये संतापाचे वातावरण आहे. 

सोलापूरच्या शिवसेनेत भूकंप...ठोंगे-पाटील गेले बरडे आले !

'हा' खेकडा शिवसेना पोखरतोय, वेळीच नांग्या मोडा; माजी मंत्र्याविरोधात शिवसैनिकांचा संताप

सावंतांनी ताणला सेनेवरच बाण, जिल्हा परिषदेत भाजपाला मतदानदरम्यान, आज तानाजी सावंत यांचे समर्थक आणि शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांची सेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेनेच्या प्रभारी जिल्हाप्रमुखपदी पुरुषोत्तम बरडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उस्मानाबादमध्ये घडलेल्या घडामोडींवर चर्चा करण्यासाठी शनिवारी मातोश्रीवर बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले आहे. तानाजी सावंत या बैठकीला जातात की नाही याकडे लक्ष असणार आहे. तसेच या बैठकीत तानाजी सावंत यांच्याबाबतच्या पुढील कारवाईबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.   

टॅग्स :तानाजी सावंतशिवसेनासोलापूरउस्मानाबादराजकारण