Join us  

फक्त 6 नाही तर दीड डझन भ्रष्ट मंत्र्यांना काढून टाका; धनंजय मुंडेंची आक्रमक भूमिका 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 2:13 PM

भ्रष्ट मंत्र्यांना राज्यातील जनता येत्या अधिवेशनात वगळल्याशिवाय राहणार नाहीत. ज्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे पुरावे दिले त्यांच्यावर कारवाई मुख्यमंत्र्यांनी केली पाहिजे

मुंबई - विधिमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर आज विरोधकांनी बैठक झाली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी रणनीती आखली. या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना मुंडेंनी आज 6 मंत्र्यांना वगळले, मात्र भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या सर्व दीड डझन मंत्री यांना काढायला हवे होते अशी मागणी केली. 

यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, भ्रष्ट मंत्र्यांना राज्यातील जनता येत्या अधिवेशनात वगळल्याशिवाय राहणार नाहीत. ज्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे पुरावे दिले त्यांच्यावर कारवाई मुख्यमंत्र्यांनी केली पाहिजे. तसेच प्रकाश मेहतांना डच्चू देऊन प्रश्न संपला असं होणार नाही. प्रकाश मेहतांवर गुन्हा दाखल करावा अशी आग्रही मागणी अधिवेशनात लावून धरणार असल्याचं त्यांनी सांगितले. 

दरम्यान अधिवेशनात राज्य सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी दुष्काळ, बेरोजगारी अशा विविध मुद्दयांवर आक्रमक होणार असल्याचं स्पष्ट केलं. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात राज्यात आहेत. त्यामुळे बेरोजगार भत्ता राज्यातील तरुणांना द्यावा अशी मागणी अधिवेशनात करणार आहोत. राज्याची आर्थिक स्थिती बिकट आहे. 2019-20 पर्यंत राज्याची महसूल तूट 35 हजार कोटींपर्यंत पोहचली आहे. राज्यात 5 वर्षात कसलाही विकास झाला नाही केवळ सरकार आभास निर्माण करते. फडणवीस यांचे हे आभासी सरकार आहे अशी टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. 

तसेच राज्यात दुष्काळात आम्ही फिरलो, मात्र सरकार, मंत्री कुठेच दिसले नाहीत, मुख्यमंत्री यांनी एसी कॅबिनमध्ये बसून दुष्काळाचा आढावा घेतला, अन शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना परदेशवारी केल्यानंतर आता शेतकऱ्यांची आठवण आली आहे. राज्यात भीषण दुष्काळ आहे, पेरणीसाठी 25 हजार रु मदत द्या, सरसकट कर्जमाफी , वीज बिल माफ करा अशा विविध मागण्यांसाठी विरोधक सदनात आक्रमक भूमिका घेणार असल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितले. त्यामुळे उद्यापासून सुरु होणारं राज्यातील विधिमंडळ अधिवेशन सरकारसाठी डोकेदुखी ठरणार असल्याचं चित्र आहे.

टॅग्स :धनंजय मुंडेराज्य सरकारदेवेंद्र फडणवीसभ्रष्टाचार