रेमडेसिविर, ऑक्सिजनसह लसीसाठीही प्रतीक्षाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 01:48 AM2021-04-18T01:48:14+5:302021-04-18T01:48:21+5:30

मुंबईकर हतबल, यंत्रणांवर ताण कायम, कोरोना नियंत्रणाचे आव्हान

Remadecivir, also waiting for vaccine with oxygen! | रेमडेसिविर, ऑक्सिजनसह लसीसाठीही प्रतीक्षाच!

रेमडेसिविर, ऑक्सिजनसह लसीसाठीही प्रतीक्षाच!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईसमोरील संसर्ग नियंत्रणाचे आव्हान गडद होत आहे. शहर, उपनगरात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा सहन करण्यापासून ते ऑक्सिजनचा पुरवठा कमी होण्याचा धोका कायम आहे. त्यात आता लसीकरणासाठी केवळ दोन दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक असून, संसर्ग नियंत्रणाचे आव्हान यंत्रणांसमोर आ वासून उभे आहे.
पालिकेने नुकतीच रेमडेसिविरचा दोन लाख व्हायल्स घेतल्या आहेत. त्यामुळे पालिका रुग्णालय किंवा कोविड केंद्रात या इंजेक्शनचा तुटवडा नसल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. त्याचप्रमाणे, या इंजेक्शनसाठी पालिका अन्य यंत्रणेवर अवलंबून नसून तुटवडा भासल्यास त्वरित निविदा काढून साठा उपलब्ध केला जात आहे. मात्र, अजूनही खासगी रुग्णालयांतील रुग्णांच्या नातेवाइकांची इंजेक्शन्ससाठीची परवड कायम आहे. याबद्दल काकाणी यांनी सांगितले की, खासगी रुग्णालयांत मार्गदर्शक तत्त्वांनुसार इंजेक्शन्सचा वापर होत नाही. सरसकट वापर होत असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ होत आहे. टास्क फोर्स तज्ज्ञांसोबत लवकरच बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याबाबत विचार सुरू आहे.
मुंबईत सध्या १५० कोविड रुग्णालये, केंद्रे आहेत. येथे २३५ मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासते. ऑक्सिजनचा साठा सुरळीत ठेवण्यासाठी पालिकेने नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे राज्य शासनाला मुंबईला अधिकचा ऑक्सिजनचा साठा पुरविण्यात यावा, अशी मागणी केल्याचेही काकाणी यांनी सांगितले.
मुंबईत आतापर्यंत १९ लाख लाभार्थ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. तरीही लसीकरणाच्या उद्दिष्टापासून अजूनही पालिका प्रशासन दूर आहे. शहर, उपनगरात दररोज एक लाख लसींचा पुरवठा केल्यास पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त नागरिकांना लस देण्यात येईल, अशी माहिती काकाणी यांनी दिली. मागणीनुसार पुरवठा नसल्याने काही खासगी केंद्रांवर येत्या दोन दिवसांत लसीचा तुटवडा भासेल, असेही काकाणी यांनी नमूद केले.

नोडल अधिकाऱ्यांकडे जबाबदारी
कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा वेळेवर व्हावा यासाठी महापालिकेने सहा नोडल अर्थात समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. ते ऑक्सिजन पुरवठादार, सहायक आयुक्त आणि अन्न व औषध प्रशासनात समन्वय राखण्याचे काम पाहतील. ऑक्सिजनच्या पुरवठ्याविषयी तक्रार असल्यास एफडीएच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

काही दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक
मुंबईत लसीचा तुटवडा जाणवल्यामुळे 
८ एप्रिल रोजी ३० लसीकरण केंद्रे, तर ९ एप्रिल रोजी ९० लसीकरण केंद्रे बंद हाेती. १० एप्रिलला पहाटे मुंबईला १ लाख लसीचे डाेस मिळाले आणि पुन्हा ४९ केंद्रांवर लसीकरण सुरू झाले होते. मात्र, आता मुंबईकरांसाठी काही दिवस पुरेल इतकाच म्हणजे दीड लाख इतक्या लसीच्या डोसचा साठा शिल्लक आहे.

Web Title: Remadecivir, also waiting for vaccine with oxygen!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.