मुंबई - एमबीबीएस प्रवेशासाठी कॉलेजने बेकायदा नऊ लाख रुपयांची मागणी केल्यामुळे प्रवेश घेऊ न शकलेल्या विद्यार्थ्याला राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने दिलासा दिला आहे. या विद्यार्थ्याला विशेष बाब म्हणून चौथ्या फेरीसाठी बसण्यास सीईटी सेलने मुभा दिली आहे. त्यामुळे पुढील फेरीमध्ये सहभागी होऊन अन्य कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याचा त्याचा मार्ग मोकळा झाला.
गडचिरोली येथील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्याला सिंधुदुर्गातील एसएसपीएम मेडिकल कॉलेज ॲण्ड लाइफटाइम हॉस्पिटल कॉलेजमध्ये एमबीबीएसची जागा मिळाली होती. कॉलेजने प्रवेशासाठी ९ लाख २० हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार त्याने सीईटी सेलकडे केली होती. इतकेच नव्हे तर कॉलेज प्रशासनाने प्रवेश रद्द करत असल्याचा ई-मेल लिहून घेऊन तो जबरदस्तीने सीईटी सेलला पाठविण्यास भाग पाडल्याचा आरोपही त्याने केला होता. त्याबाबतची तक्रार सीईटी सेल आणि वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडे (डीएमईआर) केली होती.
संबंधित तक्रारदार विद्यार्थ्याला पुढील फेरीसाठी विशेष बाब म्हणून परवानगी दिली आहे.- दिलीप सरदेसाई, आयुक्त, सीईटी सेल
संबंधित कॉलेजवरही कठोर कारवाई करावी. तसेच विद्यार्थ्यांना खासगी कॉलेजमध्ये प्रवेशावेळी अडचणी येऊ नयेत यासाठी हेल्प डेस्क निर्माण करावा. कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश समुपदेशन करताना तेथे सीईटी सेलचा प्रतिनिधी उपस्थित असणे बंधनकारक करावे. - डॉ. सिद्धिकेश तोडकर, विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक
धमक्यांमुळे शैक्षणिक नुकसान होण्याची भीतीविद्यार्थ्याच्या तक्रारीनंतर डीएमईआरने दोन सदस्यीय चौकशी समिती नेमली होती. त्यात कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. अनिता परितेकर आणि बधिरीकरणशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रदीप राऊत यांचा समावेश होता.समिती अहवाल सादर करून विद्यार्थ्याचे नुकसान टाळण्यासाठी त्याला पुढील फेरीत प्रवेश देण्याची शिफारस केली. प्रवेश नियामक प्राधिकरणाने विद्यार्थी आणि कॉलेज यांना सोमवारी चौकशीसाठी बोलावून सुनावणी घेतली होती. कॉलेजने विद्यार्थ्याला प्रवेश देण्याचे मान्य केले होते. मात्र दिलेल्या धमक्यांमुळे प्रवेश घेतल्यास शैक्षणिक तसेच अन्य नुकसान होण्याची भीती विद्यार्थ्याने व्यक्त केली होती. या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यास नकार दिला होता. या पार्श्वभूमीवर त्याला पुढील फेरीस परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Web Summary : A student denied MBBS admission due to illegal demands gets relief. CET Cell allows him to participate in the next round, opening doors to other colleges after a complaint about undue pressure and demands.
Web Summary : अवैध मांग के कारण एमबीबीएस प्रवेश से वंचित छात्र को राहत मिली। सीईटी सेल ने उसे अगले दौर में भाग लेने की अनुमति दी, जिससे अनुचित दबाव और मांगों के बारे में शिकायत के बाद अन्य कॉलेजों के दरवाजे खुल गए।