हनुमान चालीसा प्रकरण : राणा दाम्पत्याला दिलासा; सरकारची मागणी न्यायालयाने फेटाळली
By दीप्ती देशमुख | Updated: August 22, 2022 15:33 IST2022-08-22T15:32:31+5:302022-08-22T15:33:05+5:30
Hanuman Chalisa case: देशद्रोहाच्या गुन्ह्यात दिलेला जामीन रद्द करण्यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

हनुमान चालीसा प्रकरण : राणा दाम्पत्याला दिलासा; सरकारची मागणी न्यायालयाने फेटाळली
मुंबई : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा व त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी जामीन अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांचा जामीन रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारा मुंबई पोलिसांचा अर्ज विशेष न्यायालयाने सोमवारी फेटाळला.
देशद्रोहाच्या गुन्ह्यात दिलेला जामीन रद्द करण्यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला होता. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची धमकी दिल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सदर प्रकरणी न्यायालयाने राणा दाम्पत्याला अनेक अटी घातल्या होत्या.
या प्रकरणी माध्यमांशी संवाद न साधण्याची अट न्यायालयाने राणा दाम्पत्याला घातली होती. या अटीचे राणा दाम्पत्याने उल्लंघन केल्याने त्यांचा जामीन अर्ज रद्द करावा, यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष न्यायालयात अर्ज केला. विशेष न्यायालयाचे न्या. राहुल रोकडे यांनी सोमवारी राज्य सरकारचा हा अर्ज फेटाळत राणा दाम्पत्याला दिलासा दिला.