Join us

मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 06:33 IST

Mumbai Water News: मे महिन्याच्या सुरुवातीला मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांत अवघा २२.६६ टक्के पाणीसाठा उरला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बाष्पीभवनात झालेल्या वाढीमुळे धरणातील पाणीसाठा कमी झाला असला, तरी मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. सरकारने मुंबईसाठी धरणांतील राखीव कोट्यातून पाणी उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा  मानस नाही. मुंबईला ३१ जुलै २०२५ पर्यंत पुरेसा पाणीपुरवठा होईल, अशा पद्धतीने नियोजन केल्याचे पालिकेने म्हटले आहे.

मे महिन्याच्या सुरुवातीला मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांत अवघा २२.६६ टक्के पाणीसाठा उरला आहे. आधीच पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. त्यातच उन्हाळ्यात पाणी कपात होण्याची भीती त्यांना वाटत आहे. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मुख्यालयात सोमवारी उच्चस्तरीय बैठकीत पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. बैठकीला अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर, जलअभियंता पुरुषोत्तम माळवदे आदी उपस्थित होते. 

पाण्याचा वापर  काटकसरीने कराधरणांतील पाणीसाठ्यावर पालिका प्रशासन बारकाईने लक्ष ठेऊन आहे. त्याचबरोबर पावसाच्या आगमनाबाबत हवामान खात्यासमवेत समन्वय साधून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे पालिकेने या बैठकीत स्पष्ट केले. असे असले तरी नागरिकांनी पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.

अंदाज घेऊन निर्णयमागील वर्षी मुंबई आणि भिवंडी, ठाण्यातील आजूबाजूच्या परिसरात २९ मे रोजी सुरुवातीला ५ टक्के, तर ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती.जूनमध्ये पावसाचा अंदाज घेऊन, पाणीसाठा  कमी झाल्यास पालिकेकडून अतिरिक्त पाण्याचा वापर करायचा की नाही, हे ठरवले जाते.  

टॅग्स :धरण