राजीनामा देणाऱ्या जेजेच्या डॉक्टरांना दिलासा; कागदपत्रे परत करण्याचे हायकोर्टाचे निर्देश; २० लाख रुपयांच्या बाँडची अट न घालण्याची सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 14:42 IST2026-01-01T14:41:08+5:302026-01-01T14:42:16+5:30
नवी मुंबईतील स्वप्निल कोलापे व लखनऊ येथील पूजा मोदनवाल यांनी वसतिगृहातील असुविधांचे कारण देत राजीनामा दिला होता.

राजीनामा देणाऱ्या जेजेच्या डॉक्टरांना दिलासा; कागदपत्रे परत करण्याचे हायकोर्टाचे निर्देश; २० लाख रुपयांच्या बाँडची अट न घालण्याची सूचना
मुंबई : राज्य सरकारच्या अखत्यारितील जेजे रुग्णालयातून राजीनामा दिलेल्या दोन तरुण डॉक्टरांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा मिळाला. २० लाख रुपयांचा बाँड जमा करण्याची अट न घालता त्यांची मूळ कागदपत्रे परत देण्याचे निर्देश न्यायालयाच्या सुट्टीकालीन खंडपीठाने मंगळवारी दिले.
नवी मुंबईतील स्वप्निल कोलापे व लखनऊ येथील पूजा मोदनवाल यांनी वसतिगृहातील असुविधांचे कारण देत राजीनामा दिला होता. मात्र, रुग्णालयाने मूळ कागदपत्रे परत न केल्याने व २० लाखांचा बाँड भरण्याची सक्ती केल्याने दोघांनी उच्च न्यायलयात धाव घेतली होती. न्या. अश्विन भोबे यांच्या एकलपीठापुढे सुनावणी झाली. सरकारी वकिलांनी सांगितले की, दोन्ही डॉक्टर दिलेल्या नमुन्यानुसार हमीपत्र देणार असतील, तर न्यायालय त्यांना कागदपत्रे देण्याचे निर्देश देऊ शकते. मात्र, हे सर्व अंतिम निकालाच्या अधीन राहील.
याचिकाकर्त्यांचे म्हणणे
याचिकाकर्त्यांची बाजू मांडताना वकील आदित्य सांघी यांनी मंगळवारपर्यंत हमीपत्र सादर करण्यासाठी वेळ मागितला आणि कोणताही दावा करणार नसल्याचे स्पष्ट केले. हे दोघेही हुशार विद्यार्थी असून २०२५ मध्ये त्यांना सर जे. जे. हॉस्पिटमध्ये कनिष्ठ डॉक्टर म्हणून प्रवेश देण्यात आला होता.
तसेच ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये न्यूरोसर्जरीच्या सुपर-स्पेशालिटीसाठी जागा मिळाली होती. मात्र, वसतिगृहांची अवस्था दयनीय आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. इतर महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी त्यांनी मूळ कागदपत्रे परत देण्याची मागणी केली, असे सांघी म्हणाले.