Join us  

'2 लाखांवरील कर्जदारांना दिलासा', खातं मिळताच कृषिमंत्र्यांनी दिली डेटलाईन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2020 9:58 AM

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ध्येय उद्दिष्टानुसार मी

मुंबई - मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर सुमारे आठवडाभाराने नव्या मंत्र्यांच्या खातेवाटपाची यादी जाहीर झाली आहे. मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी शिफारस केलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली आहे. या मंत्रिमंडळात शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. दादा भुसेंना कृषी खाते देण्यात आलं आहे. या खात्याची जबाबदारी जाहीर होताच, दादा भुसेंनी शेतकी चिंतामुक्तीसाठी आम्ही काम करणार असल्याचं म्हटलं आहे. 

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ध्येय उद्दिष्टानुसार मी कृषी खात्याच्या माध्यमातून शेतकरी चिंतामुक्त करण्यासाठी काम करणार आहे. बोलण्यापेक्षा कृतीतून अधिक काम करेल. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, त्यामुळे आगामी काही दिवसांमध्ये शेतकऱ्याला मान-सन्मान मिळवून देण्याचं काम आम्ही करणार आहोत. या क्षेत्रात काम करणाऱ्या अभ्यासक, जाणकर आणि अधिकाऱ्यांना सोबत घेऊन शेतीसंदर्भातील योजनांचं नियोजन केल जाईल, असे दादा भुसेंनी सांगितले. 

मुख्यमंत्री महोदयांना केवळ 21 दिवसच झाले होते, तेव्हा कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांना कर्जमाफी होईलच, पण शेतकऱ्याला कायमस्वरुपी चिंतामुक्त करायचा आहे. शासनाच्या वतीने निर्णय घेण्यात येणार आहेत. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेसंदर्भात उपसमिती नेमली असून आगामी 15 दिवसांत उपसमिती अहवाल सादर करेल. त्यानंतर, दोन लाखांवरील कर्जदार शेतकरी, नियमित कर्जपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही हिताचा निर्णय होईल. येणाऱ्या दिवसांमध्ये शेतकरी आनंदी होईल, यासाठी हे सरकार काम करेल, असे कृषीमंत्री दादा भुसे यांनी म्हटले आहे. दादा भुसे यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना शेतकऱ्यांच्या हितासाठी हे सरकार जोमाने काम करणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या घोषणेनुसार शेतकरी चिंतामुक्त करण्यासाठी मी काम करेन, असे भुसे यांनी म्हटले.   

 

टॅग्स :शेतकरीशिवसेनाउद्धव ठाकरेमंत्री