Join us
Daily Top 2Weekly Top 5

७३६ दिवसांनंतर सुटका; सर्व उत्सव हाेणार धडाक्यात साजरे, 'मास्क' निर्बंध उठले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 07:23 IST

राज्यातील काेराेना नियम गुढीपाडव्यापासून मागे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : तब्बल ७३६ दिवस विविध प्रकारच्या कोरोना निर्बंधांखाली राहिलेला महाराष्ट्र गुढीपाडव्यापासून सर्व प्रकारे निर्बंधमुक्त करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला. मास्कवापराची सक्तीदेखील मागे घेण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना निर्बंध टप्प्याटप्प्याने कमी करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली होतीच. आता उर्वरित सर्वच निर्बंधांचे आकाश मोकळे करण्यात आले आहे. गुढीपाडव्याच्या मिरवणुका, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे सर्व कार्यक्रम, मुस्लीम समाजाचा पवित्र रमजान महिना असे सर्वधर्मीय सण / उत्सव नजीक असताना हा निर्णय घेत सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सर्व प्रकारचे उत्सव आता धुमधडाक्यात साजरे करता येतील.

आरोग्याचे नियम पाळागुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात. जुने ते मागे सारून नवीन कार्याचा प्रारंभ करणारा हा दिवस. एक नवीन सुरुवात करण्यासाठी कोरोना निर्बंध गुढीपाडव्यापासून पूर्णपणे उठवण्यात येत आहेत. मात्र कोरोनाचा भविष्यात धोका उद्भवू नये यासाठी नागरिकांनी मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. आरोग्याचे नियम पाळून आपली तसेच इतरांचीही काळजी घ्या.    उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री. 

केंद्र सरकार, राज्यातील टास्क फोर्स, आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्याशी चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाने अर्थव्यवस्थेला आणखी गती मिळेल, असा विश्वास मंत्रिमंडळ बैठकीत व्यक्त करण्यात आला. राज्यातील विविध जाती, धर्म आणि पंथांच्या नागरिकांनी कोरोनाकाळात त्यांच्या सण, उत्सव तसेच समारंभांनादेखील मर्यादित ठेवले व संयम पाळला. पोलीस यंत्रणा, पालिका, नगरपालिका आणि एकूणच प्रशासनाने दिवस-रात्र कोरोनाचा मुकाबला केला.     - राजेश टोपे, सार्वजनिक आरोग्यमंत्री

राज्य सरकारने २ मार्च २०२२ रोजी १४ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल केले होते आणि अन्य २२ जिल्ह्यांमध्ये तोपर्यंत असलेले निर्बंध कायम ठेवले होते. मात्र, आता सर्व ३६ जिल्हे निर्बंधमुक्त करण्यात आले आहेत. हे निर्बंध साथरोग प्रतिबंधक कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा या दोन्हींतर्गत लागू करण्यात आले होते. आता या दोन्ही कायद्यांचा कोरोनाकाळासाठीचा अंमल मागे घेण्यात आला आहे.

मास्कसक्ती रद्द, मास्क वापरणे आता ऐच्छिक 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुख्यमंत्री