रमाबाई आंबेडकर नगरात पुनर्वसनाची जागा तयार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 01:53 IST2025-05-17T01:52:28+5:302025-05-17T01:53:12+5:30
पुनर्वसनासाठीच्या इमारत उभारणीसाठी कंत्राटदार नियुक्तीचा एमएमआरडीएचा मार्ग मोकळा होणार आहे.

रमाबाई आंबेडकर नगरात पुनर्वसनाची जागा तयार!
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्यात पुनर्वसन करण्यात येणाऱ्या भूखंडावरील झोपड्या रिकाम्या करून त्यांचे पाडकाम झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) पूर्ण केले आहे. आता हा भूखंड पुढील आठवडाभरात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) हस्तांतरित केला जाणार आहे. त्यामुळे पुनर्वसनासाठीच्या इमारत उभारणीसाठी कंत्राटदार नियुक्तीचा एमएमआरडीएचा मार्ग मोकळा होणार आहे.
एसआरए आणि एमएमआरडीएमार्फत संयुक्त भागीदारीत रमाबाई आंबेडकरनगर येथील ३३.१५ हेक्टर जागेचा विकास केला जाणार आहे. त्यात अंदाजे १४,४५४ झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन केले जाईल. पहिल्या टप्प्यात कामराजनगर येथील ४०५३ झोपड्यांच्या १७ एकर जागेचा पुनर्विकास होणार असून, तेथे ८५०० झोपडीधारकांसाठी घरे बांधली जातील. त्यानंतर उर्वरित भागातील झोपडीधारकांचा पुढील दोन टप्प्यात पुनर्विकास केला जाईल.
पुढच्या टप्प्यासाठी कामराजनगर येथील ४०५३ पैकी आतापर्यंत जवळपास ३८०० झोपड्या रिकाम्या करून त्यांचे पाडकाम एसआरएने पूर्ण केले आहे. तसेच जवळपास १५ एकर भूखंडाचे सपाटीकरण झाले असून, आता हा भूखंड पुनर्विकासासाठी एमएमआरडीएला हस्तांतरित करण्याची प्रक्रिया एसआरएने सुरू केली आहे. या प्रकल्पात उभारण्यात येणाऱ्या गार्डनच्या जागेवर उर्वरित झोपड्या आहेत. त्यामुळे या झोपड्यांचे निष्कासन केले जाणार नाही. तसेच गार्डनचा हा भूखंड वगळता अन्य भागावर इमारतींची उभारणी केली जाणार आहे, अशी माहिती एसआरएच्या अधिकाऱ्यांनी दिली. पहिल्या टप्प्यात जवळपास सहा इमारतींची उभारणी करण्याचे प्रस्तावित आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
एमएमआरडीएकडून आता या भूखंडावर ८५०० रहिवाशांसाठी घरांची निर्मिती करण्यासाठी लवकरच कंत्राटदाराची नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी एमएमआरडीएकडून लवकरच निविदा काढल्या जाणार आहेत.
कसा होणार पुनर्विकास?
या प्रकल्पाचे काम चार क्लस्टरमध्ये केले जाणार आहे. यातील पहिल्या क्लस्टरमध्ये ४०५३ झोपड्या असून, या भागाचा पुनर्विकास प्रथम केला जाणार आहे. या भागावर झोपडीधारकांसाठी ८५० घरे उभारली जातील. तसेच दुसऱ्या क्लस्टरमध्ये ८,५३९ झोपड्या, तिसऱ्यात ९८१ झोपड्या आणि चौथ्यामध्ये ६८५ झोपड्यांचा समावेश आहे.