ही परफॉर्मिंग आर्ट आहे; रस्तेबांधणी नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 09:57 IST2025-05-26T09:54:04+5:302025-05-26T09:57:42+5:30
गुजराती नाटकांचे प्रयोग रात्री १२:३०-१२:४५ वाजता संपतात. त्यांना दंड आकारायला काही हरकत नाही.

ही परफॉर्मिंग आर्ट आहे; रस्तेबांधणी नाही
प्रशांत दामले
अभिनेते-दिग्दर्शक, अध्यक्ष -अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
मा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात एखादे नाटक संपायला मिनिटभर जरी उशीर झाला तरी १००० रुपये दंड आकारला जातो. रसिकांचे मनोरंजन करताना थोडा उशीर झाला तर त्याचा फटका निर्मात्यांच्या खिशाला बसत आहे. मुंबईत एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचताना बऱ्याच अडचणी येतात. उदाहरणार्थ, ट्रॅफिक, खड्डे, वाहतूक व्यवस्था, पाऊस, रेल्वेचा विलंब. हे लक्षात घेता एखाद्या नाटकाचा संध्याकाळी ४ वाजताचा प्रयोग कधीच ४ ला सुरू होऊ शकत नाही. त्या प्रयोगाची पहिली घंटा ४ वाजता वाजते. त्यानंतर ५-१० मिनिटांनी तिसरी घंटा होते.
'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकात सुरुवातीची कविता लाडची एन्ट्री बाहेर आहे. जर बरोबर ४ वाजता प्रयोग सुरू केला, तर पुढील १५-२० मिनिटे प्रेक्षक येतच राहतील. त्यांना नाटकाचा सुरुवातीचा भाग पाहता येणार नाही. त्यामुळे ४ वाजताचा प्रयोग ४:१५ वाजेपर्यंत सुरू होतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की, एखाद्या नाटकाला ५०० प्रेक्षक असतील आणि त्यातील २५० पुरुष आणि २५० महिला असतील तर त्यांना नैसर्गिक विधीसाठी किती वेळ लागेल? हा विचार करायला हवा. हे सर्व १० मिनिटांमध्ये आटोपणार नाही. त्यामुळे १५-२० मिनिटे इथे जातात. सुरुवातीची १५ मिनिटे आणि मध्यंतराची साधारण १५ मिनिटे पकडली तर अर्धा तास होतो. नाटक किती रंगते, यावरही नाटकाचा कालावधी वाढतो. प्रेक्षकांच्या प्रतिसादानुसार नाटकाच्या वेळेत ५-१० मिनिटांचा फरक पडतो.
आम्हा निर्मात्यांचे म्हणणे असे आहे की नियम आहेत, पण ते जिथे लावायचे तिथे लावा. परफॉर्मिंग आर्टसमध्ये असे नियम लावू शकत नाही.
एखादे गाणे किंवा त्यातील हरकती इतकाच वेळ घ्यायचे असे काही मोजमाप नसते. मी जर पुन्हा 'संशयकल्लोळ' नाटक करू लागलो आणि त्यात गायक राहुल देशपांडे 'मृगनयना...' गाऊ लागला, तर मी त्याला अडीच मिनिटांतच संपव, असे सांगू शकत नाही ही कला रसिकांच्या प्रतिसादावर अवलंबून असते. ही परफॉर्मिंग आर्ट आहे. रस्ता बांधणीचे काम नाही.
आम्ही नियमांच्या विरोधात नाही, पण नियम राबवताना थोडा विचार करावा. पुढल्या नाटकाची वेळ टळू नये, यासाठी आम्हीही मेहनत घेत असतो. त्यामुळे नाट्यगृहाने लागू केलेली नियमावली योग्य नाही. फार तर त्यांनी आठवण करून द्यायला हवी. २०१७ पासून ही नियमावली आहे. ३६५ दिवसांमध्ये कितीवेळा नाटकांचे प्रयोग उशिरा सुरू झाले? हा प्रश्न मी त्यांना विचारला होता. तेव्हा त्यांनी एक-दोनदाच उशीर झाल्याचे सांगितले. असे असताना इतके ताणून धरणे बरोबर नाही.
गुजराती नाटकांचे प्रयोग रात्री १२:३०-१२:४५ वाजता संपतात. त्यांना दंड आकारायला काही हरकत नाही.