Join us

शारीरिक संबंधासाठी नकार देणे ही क्रूरता; मुंबई हायकोर्टाचा निर्वाळा, पतीच्या घटस्फोटाला मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 15:24 IST

२०१५ मध्ये पुरुषाने क्रूरतेच्या आधारे पत्नीविरोधात घटस्फोटासाठी पुणे कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला होता. जो कोर्टाने मंजूर केला होता.

मुंबई - जर पत्नीने पतीला शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला आणि पतीवरच इतर महिलेसोबत संबंध असल्याचा संशय घेतला तर ते क्रूरता मानले जाईल आणि हा घटस्फोटाचा आधार असेल असं मुंबई हायकोर्टाने एका कौटुंबिक वादात दिलेल्या निर्णयात म्हटले आहे. 

न्या. रेवती मोहिते डेरे आणि न्या. नीला गोखले यांनी ही टिप्पणी करत पुणे कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोटाबाबत दिलेला निर्णय योग्य ठरवला आहे. महिलेने घटस्फोटाबाबत कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिले होते. ती याचिका हायकोर्टाने फेटाळली. या महिलेने पतीकडून १ लाख रुपये देखभाल भत्ता मिळावा अशी मागणीही केली होती. 

काय आहे प्रकरण?

या दोन्ही जोडप्याचा विवाह २०१३ साली झाला होता. परंतु डिसेंबर २०१४ मध्ये ते विभक्त झाले. २०१५ मध्ये पुरुषाने क्रूरतेच्या आधारे घटस्फोटासाठी पुणे कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला होता. जो कोर्टाने मंजूर केला होता. महिलेने तिच्या याचिकेत सासरच्यांवर तिला त्रास दिल्याचे म्हटले परंतु मी पतीवर प्रेम करते त्यामुळे मला हे लग्न मोडायचे नाही असं तिने सांगितले. मात्र पुरुषाने अनेक आधार घेत पत्नीवर क्रूरतेचा दावा केला. ज्यात शारीरिक संबध ठेवण्यास नकार देणे, पत्नीकडून वारंवार संशय घेणे आणि कुटुंब, मित्र आणि कार्यालयातील सहकाऱ्यांसमोर वारंवार अपमानित करून मानसिक छळ करणे यांचा समावेश होता. पत्नी पतीला सोडून तिच्या आई वडिलांकडे गेली होती असंही पतीने म्हटले होते. 

या प्रकरणावर सुनावणी करत हायकोर्टाने निकालात म्हटलं की, या लग्नात समझोता करण्याची कुठलीही शक्यता नाही. पतीने घटस्फोटासाठी सादर केलेले दावे कायदेशीर योग्य आहेत. त्यामुळे पत्नीची याचिका फेटाळण्यात येत असून या दोघांच्या घटस्फोटाबाबत पुणे कौटुंबिक न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवला जाईल असं सांगण्यात आले. त्याशिवाय हायकोर्टाने दर महिना १ लाख रुपये देखभाल भत्ता मिळावा ही मागणीही नाकारली आहे. पतीच्या मित्रांसमोर त्याला अपमानित करणे ही देखील क्रूरता आहे असं न्यायालयाने म्हटले. 

टॅग्स :उच्च न्यायालयपती- जोडीदारघटस्फोट