निवडणूक काळात १४ हजार ३६८ तक्रारींचे निवारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 09:41 PM2024-04-10T21:41:13+5:302024-04-10T21:41:25+5:30

मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यामध्ये महाराष्ट्र राज्य तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

Redressal of 14 thousand 368 complaints during election period | निवडणूक काळात १४ हजार ३६८ तक्रारींचे निवारण

निवडणूक काळात १४ हजार ३६८ तक्रारींचे निवारण

श्रीकांत जाधव/ मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासून भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्राप्त तक्रारींचे निवारण केले जात आहे. महाराष्ट्रातील मतदारांकडून आतापर्यंत १४ हजार ७५३ इतक्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यांपैकी १४ हजार ३६८ तक्रारींचे निवारण करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक कार्यालयाने दिली. मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यामध्ये महाराष्ट्र राज्य तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

निवडणूक आयोगाने दिलेल्या आडकेवारीनुसार महाराष्टात तक्रारींमध्ये पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक म्हणजे २ हजार ८१८ तक्रारी तर मुंबई उपनगरातून २ हजार ३३१ आणि ठाण्यातून २ हजार १८३ तक्रारी आलेल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यातून सर्वांत कमी म्हणजे ३४ तक्रारी आलेल्या आहेत. तर तक्रार निवारणात देशात नागालैंड पहिल्या आणि गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र नागालँडमध्ये आतापर्यंत फक्त १८२ तर गुजरातमध्ये ७१२४ तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. 

या तक्रारींमध्ये मतदार ओळखपत्र, मतदार यादी, मतदान चिट्ठी (स्लिप), निवडणूक आयोगाची विविध अॅप्स, राजकीय पक्ष, मतदान दिन आणि इतर, या विषयांवरील तक्रारींचा समावेश आहे. सर्वाधिक तक्रारींमध्ये मतदार ओळखपत्र प्राप्त न झालेल्यांमध्ये ४ हजार ५५६ तक्रारींचा समावेश आहे. मतदार ओळखपत्रावरील दुरुस्त्या करण्यास विलंब झाल्याबद्दल १ हजार ८४८ तक्रारी आल्या आहेत. ई- मतदार ओळखपत्राविषयी १०४७ तक्रारी आहेत, तर नवे ओळखपत्र मिळवण्याधा अर्ज नाकारल्याबद्दल ५२१ तक्रारी दाखल झालेल्या आहेत. मतदार यादीत नाव न सापडल्याबद्दल ५०० तक्रारी आलेल्या आहेत.

Web Title: Redressal of 14 thousand 368 complaints during election period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.