Join us

'बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचं काम आमच्या काळातलं, भूमिपूजनही झालं होतं'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2021 18:06 IST

Devendra Fadnavis on BDD Chawl: 'आता तेच काम दीड वर्षांचा विलंब करून पुन्हा सुरू होते आहे.'

ठळक मुद्देमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हिंमत दाखवली-शरद पवार

 मुंबई:मुंबईतील मध्यवर्ती भागात वसलेल्या वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींचे बांधकाम केले जाणार आहे. याचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेते, मंत्री उपस्थित होते. दरम्यान, त्यावरुन आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

बीडीडी चाळींच्या पुनर्विकास कामांच्या सर्व परवानग्या घेऊन आमच्या काळात त्याचं भूमिपूजनही झालं होतं, असा दावा फडणवीस यांनी केला आहे. त्यांनी याबाबत ट्विट करुन आपलं मत व्यक्त केलं. 'बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा संपूर्ण आराखडा तयार करून, सर्व प्रकारच्या परवानगी घेऊन, त्याच्या निविदा काढून कार्यादेश (वर्क ऑर्डर) सुद्धा आमच्या काळात दिले होते आणि भूमिपूजन सुद्धा झाले होते. आता तेच काम दीड वर्षांचा विलंब करून पुन्हा सुरू होते आहे. त्याचे भूमिपूजन होते आहे, याचा आम्हाला आनंद आहे. मराठी माणसाला हक्काचे मोठे घर देण्याचा आमचा संकल्प पुन्हा पुढे जाणार याचा आनंद आहे,' असं फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हिंमत दाखवलीया उद्घाटन सोहळ्यात आपले मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जाहीर कौतुक केलं. बीडीडी चाळीचा सगळा परिसर महाराष्ट्राच्या ऐक्याचा आणि सांस्कृतिक ठसा व्यक्त करणारा आहे. येथे कोकणातील, घाटावरचे लोक राहतात. या चाळींमध्ये काही बदल केले पाहिजेत. अधिक सुविधा दिल्या पाहिजेत. मालकी हक्क दिला पाहिजे. याहीपेक्षा त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली, त्यामुळे हे या ठिकाणी होऊ शकले आहे, असे कौतुकोद्गार शरद पवार यांनी यावेळी काढले. तसेच, गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रावर सातत्याने काहीना काही संकट येत आहेत. एक मोठे अतिवृष्टीचे संकट आले. हजारो घरे पडली. हजारो घरांमध्ये पाणी शिरले. होते नव्हते, ते वाहून गेले, खराब झाले. पण एक गोष्ट चांगली आहे की, या संकटांवर मात करण्याची हिंमत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवली आणि त्यातून पुनर्विकासाची कामगिरी सुरू झाली, असेही शरद पवार नमूद केले. 

टॅग्स :मुंबईशिवसेनाउद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसशरद पवार