Join us

मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 08:17 IST

मुंबईत रात्रभर सुरु असलेल्या पावसामुळे दादर, चुनाभट्टी, कुर्ला या स्थानकांवरील रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे.

Mumbai Red Alert: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे.  पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून गुरुवारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतही पावसाची संततधार कोसळत आहे. अशातच मुंबईसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच मुंबईकर नागरिकांनी आवश्यकता नसल्यास शक्यतो घराबाहेर पडणे टाळण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं आहे.

तब्बल पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एकदा मुंबईत एन्ट्री केली असून, पुढील ४८ तास मुंबईत पावसाचा जोर कायम राहणार आहे, तर रायगडला हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला असून, येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, गोकुळष्टमीला दाखल झालेल्या पावसाचा जोर मुंबईत दहीहंडीलाही कायम राहणार असल्याने मुंबईकर गोविंदांच्या उत्साह आणखी भरच पडणार आहे.

मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून मुंबईसह राज्यभरात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. १६ ऑगस्ट रोजी मुंबईसह संपूर्ण कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषतः रायगडमध्ये पावसाचा जोर अधिक असणार असून, या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. १७ ऑगस्ट रोजी संपूर्ण कोकणासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यासाठीही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबईत दोन दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. रेल्वे स्थानकांपासून ते रेल्वे रुळांपर्यंत सर्वत्र पाणी साचले आहे. दादर, माटुंगा अंधेरी, कुर्ला, चेंबूरमधील अनेक भागात पाणी साचलं आहे. पहाटे १ ते पहाटे ४ वाजेपर्यंत विक्रमी पाऊस पडला आहे. हवामान खात्याच्या कुलाबा आणि सांताक्रूझ वेधशाळांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस पडला. कुलाबा येथे ४५.२ मिमी आणि सांताक्रूझमध्ये ११.५ मिमी पाऊस पडला. पावसाळ्याच्या सुरुवातीपासून कुलाबा येथे १११९.२ मिमी आणि सांताक्रूझमध्ये १४३५.७ मिमी पाऊस पडला आहे.

दुसरीकडे, भारतीय हवामान खात्याने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तर ठाण्यासाठी १६ आणि १७ ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत होऊ शकते, असा इशारा विभागाने दिला आहे. तसेच मुंबईकर नागरिकांनी आवश्यकता नसल्यास शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं आहे.

टॅग्स :मुंबईचा पाऊसमुंबई लोकल