हिवाळ्यातही विजेची विक्रमी मागणी; २५,८०८ मेगावॅटचा पुरवठा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 09:36 IST2025-01-14T09:35:39+5:302025-01-14T09:36:01+5:30
मुंबईचा काही भाग वगळता संपूर्ण राज्यातील वीज पुरवठ्याची जबाबदारी महावितरणकडे आहे.

हिवाळ्यातही विजेची विक्रमी मागणी; २५,८०८ मेगावॅटचा पुरवठा
मुंबई : हिवाळ्यात थंडीमुळे विजेची मागणी कमी होत असली तरी ११ जानेवारी रोजी राज्यात २५,८०८ मेगावॅट इतकी आतापर्यंतच्या विजेची विक्रमी मागणी नोंदविण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे कोणतीही अतिरिक्त वीजखरेदी न करता ही मागणी पूर्ण करण्यात आली आहे, असा दावा महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांनी केला आहे.
यंदा मोसमात पाऊस चांगला झाला असल्याने कृषी पंपांसाठी विजेची मागणी वाढली असल्याचा महावितरणचा अंदाज असून, उन्हाळ्यात विजेच्या मागणीत वाढ लक्षात घेऊन ग्राहकांना वीज पुरवठ्यासाठी महावितरणने नियोजन केले आहे.
महावितरणने वाढत्या वीज मागणीनुसार पुरवठ्याचा आराखडा तयार केला आहे. त्यामुळे उच्चांकी मागणीनुसार महावितरणला वीज पुरवठा करता येत आहे.
मुंबईचा काही भाग वगळता संपूर्ण राज्यातील वीज पुरवठ्याची जबाबदारी महावितरणकडे आहे. ११ जानेवारी रोजी महावितरणकडे २५,८०८ मेगावॅटची वीज मागणी नोंदविली गेली. आतापर्यंतचा हा उच्चांक आहे. यापूर्वी ७ फेब्रुवारी २०२४ रोजी २५,४१० मेगावॅट तर १४ एप्रिल २०२२ रोजी २५,१४४ मेगावॅट अशी उच्चांकी वीजमागणी नोंदविली गेली होती.
असा झाला पुरवठा
विजेच्या मागणीचा पॅटर्न लक्षात घेऊन महावितरणच्या संबंधित विभागाने यापूर्वीच वीज खरेदी करार केले होते. त्यानुसार उच्चांकी वीज मागणी पूर्ण करण्यात आली.
जलविद्युत प्रकल्पांमधून २००९ मेगावॅट, सौर ऊर्जा प्रकल्पांमधून ३०९३ मेगावॅट, पवन ऊर्जा प्रकल्पांमधून २२८ मेगावॅट आणि सहविद्युत निर्मिती प्रकल्पांमधून २४९८ मेगावॅट वीज मिळाली.