Join us

‘उल्लास’ला स्वयंसेवकांचा ‘रेकॉर्डब्रेक’ प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 11:43 IST

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार, ‘उल्लास’  कार्यक्रम राबविला जात असून त्यात यावर्षी आठ लाख प्रौढांना साक्षर करून त्यांची परीक्षा घेण्याचे उद्दिष्ट आहे.

मुंबई : शंभर टक्के साक्षरतेचे उद्दिष्ट ठेवून प्रौढ निरक्षरांसाठी उल्लास अर्थात अंडरस्टँडिंग लाइफलाँग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी हा विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यात  ५७ हजार ७३३ स्वयंसेवक नियुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, त्यासाठी दुप्पट म्हणजे सव्वालाख स्वयंसेवकांनी नोंदणी झाली असून त्यात मुंबई व उपनगरात मिळून ६ हजारांहून अधिक स्वयंसेवकांचा समावेश आहे.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार, ‘उल्लास’  कार्यक्रम राबविला जात असून त्यात यावर्षी आठ लाख प्रौढांना साक्षर करून त्यांची परीक्षा घेण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी राज्यभरात ११ जानेवारीपर्यंत तब्बल १ लाख २१ हजार २३७ तरुण स्वयंसेवक म्हणून नोंदणी केली आहे. उल्लास ॲपवर नोंदणी करून स्वयंसेवकांनी आपापल्या क्षेत्रातील प्रौढांना शिकविणेही सुरू केले आहे. स्वयंसेवकांमध्ये विद्यार्थी, बेरोजगार तरुण, अंगणवाडीसेविका यांचाही समावेश आहे.

मुंबईत ६०२० स्वयंसेवक नोंदणीराज्यातील शिक्षित तरुणांनी निरक्षरांसाठी दाखविलेला हा उत्साह सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. मुंबई व उपनगर जिल्ह्यातही प्रौढांना मोफत शिकविण्यासाठी ६ हजार २० स्वयंसेवकांनी नोंदणी केली आहे. शिवाय आतापर्यंत ११ हजार ११६ प्रौढ साक्षर झाल्याचे ॲपवरील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. या स्वयंसेवकाची संख्या ठाण्यात ३ हजार ९२९, तर रायगड जिल्ह्यात २ हजार ३३८ आहे.

काय आहे ‘उल्लास’?केंद्र सरकारने  १ एप्रिल २०२२ पासून नवभारत साक्षरता कार्यक्रम सुरू केला आहे. देशात अठरा कोटींहून अधिक लोक निरक्षर असून, त्यात महाराष्ट्रातील दीड कोटींहून अधिक निरक्षरांना २०२७ पर्यंत साक्षर केले जाणार आहे. त्यासाठी प्रत्येकी १० व्यक्तींसाठी एक स्वयंसेवक नेमला जाणार आहे. यामध्ये आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना काम करता येणार आहे.

टॅग्स :शिक्षक