Join us

पश्चिम रेल्वे: वांद्रे-माहीम स्थानकांदरम्यानच्या मिठी नदीवरील पुलाच्या पुनर्बांधणीचे काम पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 06:50 IST

Western Railway Update: पुलाच्या जागेवर जाण्यासाठी थेट रस्ता उपलब्ध नसल्याने यंत्रसामग्री आणि साहित्यांची जमवाजमव, ने-आण ही तीन स्टेबलिंग लाईन्स ब्लॉक करून केले होते.

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील वांद्रे आणि माहीम स्थानकांदरम्यानच्या मिठी नदीवरील रेल्वे पुलाची पुनर्बांधणी पूर्ण करण्यात आली आहे. पूल क्रमांक २० च्या पुनर्बांधणीसाठी पश्चिम रेल्वेने ११ आणि १२ एप्रिलच्या मध्यरात्री सुमारे आठ तासांपेक्षा अधिक ब्लॉक घेऊन हे काम पूर्ण केले. त्यामुळे या मार्गावरील शेवटचा स्क्रू पूल आता अधिक भक्कम झाला आहे. 

या पुलाच्या कामासाठी पश्चिम रेल्वेला मोठी कसरत करावी लागली. मिठी नदीच्या दोन्ही बाजूंना (पूर्व आणि पश्चिम) भरती-ओहोटी लक्षात घेऊन काम करावे लागले. 

पुलाच्या जागेवर जाण्यासाठी थेट रस्ता उपलब्ध नसल्याने यंत्रसामग्री आणि साहित्यांची जमवाजमव, ने-आण ही तीन स्टेबलिंग लाईन्स ब्लॉक करून केले होते. पुनर्बांधणीत पुलाचे जुने खांब आणि गर्डर बदलून त्याच्या जागी नवीन खांब उभारले आहेत. 

मार्च २०२३ मध्ये या पुलाच्या बांधकामासाठी ईपीसी पद्धतीने निविदा मागवली होती, असे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले. 

मोठ्या यंत्रसामग्रीचा वापर, कामासाठी दीडशे लोक  

पुलाच्या पुनर्बांधणीसाठी ७०० मेट्रिक टन क्रेन (एका स्टँडबाय क्रेनसह), १० डम्पर, पोकलेन, २ जेसिबी, टॅपिंग मशीन, २ टॉवर वॅगन, १० बीआरएन तसेच दीडशे लोकांचे मनुष्यबळ लागले होते.

टॅग्स :मुंबई लोकलपश्चिम रेल्वेमुंबई लोकल मेगा ब्लॉकरेल्वे