सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी; सर्वाधिक भाजपमध्ये, अनेक विद्यमान आमदारांच्या नातेवाईकांना तिकीट नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 15:10 IST2025-12-31T15:10:30+5:302025-12-31T15:10:55+5:30
मुंबई भाजपने या महापालिका निवडणुकीत ‘घराणेशाही’ डावलत, मुंबईतून अनेक विद्यमान आमदारांच्या नातेवाईकांना तिकीट नाकारले.

सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी; सर्वाधिक भाजपमध्ये, अनेक विद्यमान आमदारांच्या नातेवाईकांना तिकीट नाही
मुंबई : मुंबईमध्ये या निवडणुकीत आठ प्रमुख राजकीय पक्ष असले तरी यात शिंदेसेना, उद्धवसेना आणि भाजपमध्ये बंडखोरी झाल्याचे चित्र आहे. यात सर्वाधिक प्रमाण भाजपमध्ये असल्याची चर्चा आहे.
मुंबई भाजपने या महापालिका निवडणुकीत ‘घराणेशाही’ डावलत, मुंबईतून अनेक विद्यमान आमदारांच्या नातेवाईकांना तिकीट नाकारले. विद्यमान आमदार, खासदारांचे जवळचे नातेवाईक किंवा विधानसभा निवडणुकीत ज्यांना पक्षाने उमेदवारी दिली होती अशांना या निवडणुकीत तिकीट देण्यात आले नाही, असे एका भाजप नेत्याने सांगितले. यामुळे आ. मनीषा चौधरी, आ. तमिळ सेल्वन, आ. विद्या ठाकूर, आ. राजहंस सिंह व अन्य काही आमदारांना फटका बसला तर मंत्री आशिष शेलार यांचे बंधू माजी नगरसेवक यांना संधी नाकारण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. असे असले तरी गोरेगाव भाजप उपाध्यक्ष संदीप जाधव यांनी प्रभाग ५४ मधून तर त्यांच्या पत्नी सुशीला जाधव यांनी प्रभाग ५१ मधून, भाजपा मुंबई पदाधिकारी सरबजीत सिंग संधू यांनी अंधेरी पूर्व प्रभाग ८६ मध्ये तर प्रभाग ६० मधून भाजपाच्या माजी प्रदेश सचिव दिव्या ढोले यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
शिंदेसेनेच्या अनेकांनी भरले अपक्ष उमेदवारी अर्ज
प्रभाग ७ मध्ये शिंदेसेनेचे दहिसर विधानसभा प्रमुख भूपेंद्र कवळी, प्रभाग ८ मध्ये त्यांची पत्नी अम्रिता कवळी, प्रभाग २६ मध्ये शाखाप्रमुख सचिन केळकर, प्रभाग ५१ मध्ये गोरेगाव दिंडोशी विधानसभा प्रमुख गणेश शिंदे यांची कन्या श्रेया शिंदे, प्रभाग ६७ मध्ये राजू नेटके, प्रभाग ७१ मध्ये शिंदेसेनेचे उत्तर-मध्य मुंबई लोकसभा सह समन्वयक जितेंद्र जानावळे यांची कन्या अजिता जानावळे मधून अपक्ष अर्ज भरला आहे.
उद्धवसेनेतही मोठी नाराजी
विरोधी पक्षातील उद्धवसेनेतही मोठ्या प्रमाणावर नाराजी असून त्यातून बंडखोरी उफाळून आली आहे. प्रभाग १९३ मधील उद्धवसेनेच्या उमेदवार हेमांगी वरळीकर यांच्याविरोधातही बंडखोरी झाली आहे. वरळीतील शाखाप्रमुख सूर्यकांत कोळी यांनी उमेदवारी अर्ज भरला असून उद्धवसेनेचे पदाधिकारी सूर्यकांत बिर्जे, रुणाल लाड यांनी पक्षाकडे राजीनामे दिले आहेत. प्रभाग ५९ मधून सचिन शिवेकर यांनीही बंडखोरी केली आहे.