इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे बंडखोरी? उमेदवारी जाहीर करण्याबाबत राजकीय पक्षांचा सावध पवित्रा; प्रत्येक प्रभागात ६-८ जणांत स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 11:18 IST2025-12-24T11:18:21+5:302025-12-24T11:18:51+5:30
एकीकडे भाजप-शिंदेसेना युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे, तर दुसरीकडे उद्धवसेना आणि मनसे पहिल्यांदाच एकत्रित निवडणुकीला सामोरे जात असून बुधवारी युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे बंडखोरी? उमेदवारी जाहीर करण्याबाबत राजकीय पक्षांचा सावध पवित्रा; प्रत्येक प्रभागात ६-८ जणांत स्पर्धा
- सुजित महामुलकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांनी भाऊगर्दी केल्याने प्रमुख राजकीय पक्षांनी बंडखोरीचा धसका घेतला आहे. त्यामुळे सर्वांनीच सावध पवित्रा घेतला असून उमेदवारी जाहीर होण्यास बराच उशीर होऊ शकतो, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली. ३० डिसेंबरपर्यंत मुदत आहे.
एकीकडे भाजप-शिंदेसेना युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे, तर दुसरीकडे उद्धवसेना आणि मनसे पहिल्यांदाच एकत्रित निवडणुकीला सामोरे जात असून बुधवारी युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
या चारही प्रमुख पक्षांमध्ये प्रत्येक प्रभागात सरासरी ६ ते ८ इच्छुक उमेदवार आहेत. काहींच्या मुलाखती घेऊन झाल्या
आहेत, तर काहींचे पक्षीय पातळीवर सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. मुंबईत २२७ प्रभाग असून त्यासाठी हजारो कार्यकर्ते इच्छुक आहेत.
‘अभी नही तो कभी नही’ची भावना
यंदा बंडखोरी मोठ्या
प्रमाणावर होण्याची आणखी एक भीती म्हणजे महापालिका निवडणुकीनंतर मुंबईत पुढील किमान साडेतीन वर्षांनी लोकसभा आणि चार वर्षांनी विधानसभा निवडणूक होईल.
महापालिका निवडणूकही
२०१७ नंतर तब्बल नऊ वर्षांनी होत आहे. त्यामुळे ‘अभी नही तो
कभी नही’, अशी भावना इच्छुकांमध्ये आहे.
इरादा पक्का, माघार नाहीच
गेल्या निवडणुकीत थोडक्यात नगरसेवक पदाने हुलकावणी दिली. त्यामुळे गेली जवळपास सहा-सात वर्षे प्रभागात काम केले. जनसंपर्क ठेवला आणि सुदैवाने प्रभागाचे आरक्षण सोयीचे पडल्याने पक्षाकडून तिकीट कापले तरी माझा इरादा पक्का आहे.
माघार नाहीच, अशी भावना एका राजकीय पक्षाच्या इच्छुक उमेदवाराने व्यक्त केली, तर दुसऱ्या एका इच्छुक उमेदवाराने प्रभागात केलेल्या कामाची पक्षाकडून दखल घेतली जाईल आणि अधिकृत उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
जागावाटपाचे प्रमाण ७०-३०?
एकही पक्ष सर्वच्या सर्व २२७ जागा लढणार नाही. युती असल्याने जागावाटपाचे प्रमाण साधारण ७०-३० राहण्याची शक्यता असल्याने अन्य इच्छुक उमेदवार एक तर अन्य पक्षाकडून उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न करतील किंवा अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.