Join us  

'देशातील मशिदी व चर्चमधील सोन्याबद्दल बोलण्याची हिम्मत पृथ्वीराज चव्हाण दाखवतील काय?'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 6:51 PM

शिर्डी हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे देवस्थान मानले जाते. शिर्डी देवस्थानकडे सध्या सुमारे साडेचारशे किलो सोने आहे. भक्तांनी ते विविध प्रकारे दान म्हणून दिलेले आहे.

मुंबई - कोरोनामुळे अडचणीत असलेल्या उद्योगधंदे, नोकरदार, मजूर वर्गाला दिलासा देण्यासाठी त्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारकडून 20 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना पंतप्रधानांची घोषणा ही समाधानाची बाब आहे, आता त्याचा योग्य विनियोग होईल ही अपेक्षा आहे असं सांगितलं. तसेच केंद्र सरकारने ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घ्यावे, अशी सूचना पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. चव्हाण यांच्या या सूचनेला शिर्डीच्या साई संस्थानचे अध्यक्ष डॉ. हावरे यांनी विरोध केला आहे,  

शिर्डी हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे देवस्थान मानले जाते. शिर्डी देवस्थानकडे सध्या सुमारे साडेचारशे किलो सोने आहे. भक्तांनी ते विविध प्रकारे दान म्हणून दिलेले आहे. शिर्डी संस्थानचे वार्षिक उत्त्पन्न ७०० कोटी असून विविध प्रकारचा वार्षिक खर्च ६०० कोटी रुपये इतका आहे. लाकडाऊनमुळे संस्थानच्या उत्पन्नात लक्षणीय स्वरुपात घट झाली आहे. मात्र, तरीही संस्थानने एफडी मोडून कर्मचाऱ्यांचा एप्रिल महिन्यातील पगार केला आहे. 

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होती की, World Gold Concil च्या अंदाजानुसार देशात 1 ट्रिलियन डॉलर (किंवा 76 लाख कोटी रुपये) इतके सोने आहे. सरकारने हे सोने 1 किंवा 2 टक्के व्याजाने परतीच्या बोलीवर ताब्यात घ्यावे अशी सूचना पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. कोरोना महामारीमुळे देशावर आलेलं आर्थिक संकट दूर करण्यासाठी देवस्थानच्या सोन्यासंदर्भात चव्हाण यांनी सूचना मांडली होती. चव्हाण यांच्या या सुचनेला अनेकांनी विरोध केला आहे. तर शिर्डी साई संस्थाननेचे प्रमुख डॉ. हावरे यांनीही चव्हाण यांना प्रश्न विचारला आहे. 

“देशांतील सर्व मशिदीं व चर्चेस मध्ये पडून असलेले सोने सरकारने ताबडतोब ताब्यात घ्यावे” असे म्हणण्याची हिम्मत मा. पृथ्वीराज चव्हाण दाखवतील काय? मंदीरांबद्दल बोलणे फार सोपे आहे साहेब....! असे ट्विट हावरे यांनी केले आहे.  चव्हाण यांच्या वक्तव्यावर संतप्त झालेले संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी मंदीराबाबत बोलणे सोपे आहे, देशातील मशिदी व चर्चेस मध्ये पडून असलेले सोने सरकारने ताबडतोब ताब्यात घ्यावे असे म्हणण्याची हिंमत चव्हाण करतील का? असा सवाल उपस्थीत केला आहे. चव्हाण यांचे हे राजकीय स्टेटमेंट आहे़ त्यांना खरेच तसे वाटत असते तर त्यांनी राज्य व केंद्र सरकारशी चर्चा केली असती. याशिवाय त्यांनी ताबडतोब सोने ताब्यात घ्या असे शब्द वापरले आहेत, हे शब्द अरेरावीचे वाटतात तसेच त्यातुन त्यांची ही आपल्या मालकीची प्रापर्टी असल्याचा वास येतो. त्यांनी सुचना किंवा विनंती केली असती तर समजु शकलो असतो. मात्र, हे सोने बेवारस नाही तर भक्तांची प्रॉपर्टी आहे. ताबडतोब ताब्यात घ्या असे शब्द ते मशिद किंवा चर्चेस बाबतीत वापरू शकले असते का़? त्यांचा हा केवळ राजकीय स्टंट आहे. यातुन हिंदु देवस्थाने व मंदीरांचा एकप्रकारे अवमान झाला आहे.

दरम्यान, सध्या विविध कारणांमुळे संस्थानचे विश्वस्थ मंडळ वादात अडकलेले आहे. त्यामुळे मोजकेच विश्वस्थ सध्या उरले असून त्यांचे आर्थिक अधिकारही मर्यादित करण्यात आले आहेत. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांना सर्व मोठ्या आणि धोरणात्मक व्यवहारासाठी हायकोर्टाची परवानगी घ्यावी लागते. पृथ्वीराज चव्हाण यांच्या देवस्थान ट्रस्टमधील सोनं ताब्यात घेण्याच्या विधानानंतर काशी विश्वनाथ मंदिराच्या महंतानी मोठा निर्णय जाहीर केला आहे. पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांना काशी विश्वनाथ मंदिरात बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर देशातील इतर ज्योतिर्लिंगाच्या पुरोहितांनीही चव्हाण कुटुंबाला मंदिरात प्रवेश नाकारण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. एवढंच नाही तर पृथ्वीराज चव्हाण हे मानसिकदृष्ट्या विक्षिप्त असल्याचंही महंतांनी म्हटलं आहे.

टॅग्स :शिर्डीपृथ्वीराज चव्हाणउच्च न्यायालयसोनं