Bhaskar Jadhav on Sanjay Shirsat: महाराष्ट्रात सरकारमधील मंत्री असलेले शिवसेना नेते संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अचानक वाढलेल्या मालमत्तेबाबत प्राप्तिकर विभागाने नोटीस पाठवलेली असताना आता संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शिरसाट बेडवर शॉर्ट्स आणि बनियान घालून बसले आहेत. यावेळी त्यांच्या शेजारी एक ट्रॉली बॅग ठेवलेली दिसते, जी नोटांनी भरलेली आहे. या व्हिडीओवर स्पष्टीकरण देताना संजय शिरसाट यांनी ती बॅग कपड्यांची असल्याचे म्हटलं. दुसरीकडे ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी बॅगेतील पैसे दान करुन टाकावेत असं म्हटलं.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा एक धक्कादायक व्हिडीओ पोस्ट केला. मंत्री संजय शिरसाठ हे हॉटेलमध्ये पैशांच्या बॅगा घेऊन बसल्याचा दावा या व्हिडीओच्या माध्यमातून केला होता. मात्र शिरसाठांनी हा व्हिडीओ त्यांच्या बेडरूमधील असल्याचे सांगितले. तसेच बॅगेमध्ये पैसे नसून कपडे असल्याचे स्पष्टीकरण शिरसाठांनी दिलं. मात्र भास्कर जाधव यांनी हे सगळं अंतर्गत राजकारणातून घडत असल्याचे म्हटलं आहे.
"पैशाने भरलेली बॅग संजय शिरसाट यांच्या रुममध्येच होती. त्यांच्या रूममध्ये असलेल्या बॅगेत सरळ सरळ पैसे दिसत होते. ते पैसे त्यांचे नसतील तर मला वाटतं की त्यांनी ती पैशांची बॅग कुठल्यातरी एका शिक्षण संस्थेला किंवा कुठल्यातरी एखाद्या चांगल्या कामाला दान करून टाकावी. ती बॅग आणि पैसे माझे नाहीत ती मला मिळालेले आहेत आणि हे माझ्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे मी या पैशांचा दानधर्म करतोय असं सागावं आणि पुण्य मिळवावं," असं भास्कर जाधव म्हणाले.
"महाराष्ट्रामध्ये या लोकांचे सरकार निवडून दिल्याबद्दल जनतेला पश्चाताप होतोय. मोठ्या प्रमाणात यांचे आमदार निवडून आल्यामुळे ही मस्ती आलेली आहे. विरोधी पक्ष हा थोडा आहे आणि आमचा आवाज दाबला जातोय. महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरे रोज वेशीवर टांगली जात आहेत. आपण यांना या ठिकाणी आणून काय केलं याचा विचार जनतेने केला पाहिजे," असंही भास्कर जाधव म्हणाले.
"संजय शिरसाठ यांचा व्हिडिओ जवळच्याच कुठेतरी माणसाने काढला असेल किंवा तीन पक्षांच्या या सरकारमध्ये एकमेकांचा पत्ता कापायचं काम सुरू आहे. धनंजय मुंडे यांचा पत्ता कापून झाला, त्यानंतर जयकुमार गोरे यांची विकेट पडता पडता राहिली आणि आता संजय शिरसाट यांची विकेट पडली पाहिजे यासाठी अंतर्गत राजकारणातून हे सगळं घडत आहे," असं भास्कर जाधवांनी म्हटलं.
संजय शिरसाठ यांनी आयकर विभागाची नोटीस आली हे कबूल केले आहे. पण आयकर विभागाला ही उघडी बॅग दिसत नाही का असाही सवाल भास्कर जाधव यांनी केला.