सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 05:39 IST2025-10-15T05:39:22+5:302025-10-15T05:39:37+5:30
खिशात एक पैसाही नसल्यामुळे या मुलाने भूकही मारली. पंजाब मेलने तब्बल २५ तासांचा प्रवास उपाशीपोटी करत तो दादर रेल्वे स्थानकात दाखल झाला.

सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आई-वडील कोरोना काळातच वारले, तेव्हापासून आश्रमच त्याचे घर झाले. पण, एका कुटुंबाने त्याला दत्तक घेतले. त्यामुळे आई-वडिलांचे छत्र मिळाल्याचा आनंद असतानाच कुटुंबातील इतर मुले त्रास देऊ लागली. त्यामुळे बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खान, सलमान खान आणि रॉकी भाईला त्याने आदर्श मानले. त्यांना भेटण्याची ओढ त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. अखेर त्याने उत्तर प्रदेशच्या गाझीयाबादमधील आपले घर सोडले आणि उपाशीपोटी दोन दिवसांचा विनातिकीट रेल्वेप्रवास करून थेट मुंबई गाठली. ही गोष्ट आहे, १४ वर्षांच्या अनाथ मुलाची. या मुलाची रवानगी चाइल्ड हेल्पलाइन आणि चिल्ड्रन्स इंडिया यांनी माटुंग्याच्या डेव्हिड ससून येथील बालगृहात केली आहे.
खिशात एक पैसाही नसल्यामुळे या मुलाने भूकही मारली. पंजाब मेलने तब्बल २५ तासांचा प्रवास उपाशीपोटी करत तो दादर रेल्वे स्थानकात दाखल झाला.
अन् बालगृहात रवानगी
आपले आवडते सुपरस्टार कुठे राहतात याचा शोध त्याने घेतला. इतर प्रवाशांशी बोलताना त्याला शहारूख, सलमान वांद्र्यात राहत असल्याचे समजले. तिथून पत्ता शोधत तो त्यांच्या बंगल्यापर्यंत पोहोचला. कधीतरी त्यांचे दर्शन होईल, त्यांना भेटता येईल या ओढीने उपाशीपोटीच त्याने कित्येक तास बंगल्याबाहेरच घालवले. त्यातच दाक्षिणात्य सुपरस्टार यश बंगळुरूला राहत असल्याचे त्याला समजले. शाहरूख, सलमानची भेट झाली नाही. त्यामुळे निराश होऊन बंगळुरूचा रस्ता धरण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा दादर स्थानक गाठले.
फलाट क्रमांक १२ वर तो रेंगाळत होता. दोन दिवस अन्नपाणी पोटात गेले नसल्याने तो थकलेला दिसत होता. चाइल्ड हेल्पलाइनचे कर्मचारी चेतन कोळी आणि रेल्वे चिल्ड्रन्स इंडिया कर्मचारी सरिता मोहाने यांनी त्याला विश्वासात घेत त्याची प्रेमाने विचारपूस केली. त्याची कहानी ऐकल्यानंतर दोघेही भावूक झाले. अखेर त्यांनी त्याला दादर सेंट्रल रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक १४ जवळील दादर रेल्वे चाइल्ड हेल्प डेस्क बूथवर आणले. नंतर त्याला बालगृहात पाठवण्यात आले.