मतदार याद्यांची नव्याने पडताळणी, निवडणूक कार्यक्रम जबाबदारीने राबवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 13:59 IST2026-03-24T13:59:25+5:302026-03-24T13:59:25+5:30
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे निर्देश

मतदार याद्यांची नव्याने पडताळणी, निवडणूक कार्यक्रम जबाबदारीने राबवा
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, मतदार याद्यांची नव्याने पडताळणी करण्याच्या दृष्टीने निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांनी जबाबदारीने आणि प्रभावीपणे विशेष पडताळणी कार्यक्रम राबवावा, अशी सूचना मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केली.
मतदार याद्यांची पडताळणी करण्याच्या अनुषंगाने, महापालिकेच्या निवडणूकविषयक अधिकाऱ्यांसोबत पूर्वतयारीसाठी आज वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय येथील पेंग्विन सभागृहात बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.
राजस्थानचे मुख्य निवडणूक अधिकारी नवीन महाजन, अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा, डॉ. अश्विनी जोशी, डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी (मुंबई शहर) आंचल गोयल, जिल्हाधिकारी (उपनगर) सौरभकटियार, पालिकेचे सहआयुक्त विश्वास शंकरवार यांची यावेळी उपस्थिती होती.
वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय येथील पेंग्विन सभागृहात बैठक पार पडली. यावेळी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
'बीएए नियुक्त करावेत'
राजस्थानमध्ये नुकताच मतदार याद्यांच्या विशेष पडताळणीचा कार्यक्रम पार पडला. त्यासाठी केलेली व्यवस्था, आलेल्या अडचणी व निराकरणासाठी केलेल्या उपाययोजना यासंबंधी महाजन यांनी सादरीकरण केले. तर, राजकीय पक्षांची बैठक घेऊन प्रत्येक बीएए (बूथ लेव्हल एजंट) यांची नेमणूक करावी, असे चोक्कलिंगम यांनी सांगितले.