बांधकाम सुरक्षा त्रुटींवरील याचिकेवर पुन्हा सुनावणी; भिवंडी मेट्रो रिक्षा अपघात प्रकरणाची उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 09:37 IST2025-08-09T09:36:38+5:302025-08-09T09:37:10+5:30

भिवंडी येथे ५ ऑगस्ट रोजी झालेल्या दुर्घटनेत एका २० वर्षीय प्रवाशाच्या डोक्यात रॉड घुसला.

Re-hearing of petition on construction safety flaws; High Court takes serious note of Bhiwandi Metro rickshaw accident case | बांधकाम सुरक्षा त्रुटींवरील याचिकेवर पुन्हा सुनावणी; भिवंडी मेट्रो रिक्षा अपघात प्रकरणाची उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल 

बांधकाम सुरक्षा त्रुटींवरील याचिकेवर पुन्हा सुनावणी; भिवंडी मेट्रो रिक्षा अपघात प्रकरणाची उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल 

मुंबई : भिवंडी येथील बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो रेल्वेच्या जागेवरून लोखंडी रॉड  रिक्षावर पडून एक प्रवासी गंभीर जखमी झाला. या घटनेची मुंबई उच्च न्यायालयाने गांभीर्याने दखल घेत २०२३ मध्ये उंच इमारतींच्या बांधकाम ठिकाणी सुरक्षा त्रुटींबाबत दाखल केलेल्या याचिकेवर पुन्हा सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले.

भिवंडी येथे ५ ऑगस्ट रोजी झालेल्या दुर्घटनेत एका २० वर्षीय प्रवाशाच्या डोक्यात रॉड घुसला. वारंवार होणाऱ्या सुरक्षा उल्लंघनाबाबत संताप व्यक्त करत न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने म्हटले की, २०२३ मध्ये एक समिती स्थापन करण्यात आली असली तरी त्या समितीच्या शिफारशी सर्व नियोजन अधिकाऱ्यांना पाठविल्या नव्हत्या.

२०२३ मध्ये, वरळीत बांधकामाच्या ठिकाणी इमारतीच्या ५२ व्या मजल्यावरून सिमेंट ब्लॉक पडून २ जणांचा मृत्यू झाल्याने उच्च न्यायालयाने स्वयंप्रेरणेने याचिका दाखल करून घेतली. त्यावेळी न्यायालयाने उंच इमारतींच्या बांधकामाच्या ठिकाणी लोकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांची शिफारस करण्याकरिता समिती नेमली हाेती.  

न्यायालय पुन्हा चिंतेत 
बांधकाम सुरू असलेल्या पुलावरून लोखंडी रॉड पडून तो एका प्रवाशाचा डोक्यात घुसला. अलीकडेच घडलेल्या या घटनेमुळे न्यायालय पुन्हा चिंतेत पडले आहे, असे खंडपीठाने म्हटले.

पुढील सुनावणी १२ ला 
न्यायालयाने मुंबई महापालिकेला तज्ज्ञ समितीच्या सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांची नोंद करण्याचे निर्देश दिले. राज्यातील सर्व महापालिका आणि नियोजन प्राधिकरणांना अंमलबजावणीसाठी पाठविण्यात येतील. 

या उपाययोजना व्यापक जनहितासाठी आहेत म्हणून त्यावर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे, असे म्हणत न्यायालयाने पुढील सुनावणी १२ ऑगस्ट रोजी ठेवली.

Web Title: Re-hearing of petition on construction safety flaws; High Court takes serious note of Bhiwandi Metro rickshaw accident case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.