Re-examination of 'those' patients, Determination of corona discharge policy | ‘त्या’ रुग्णांची पुन्हा तपासणी, कोरोनाविषयी डिस्चार्ज धोरण निश्चित
‘त्या’ रुग्णांची पुन्हा तपासणी, कोरोनाविषयी डिस्चार्ज धोरण निश्चित

मुंबई : रुग्णालयात निरीक्षणाखाली दाखल असलेल्या ‘त्या‘ तीन रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. त्यांचे पुन्हा चार दिवसांनी नमुने घेऊन राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठवावे, दुसरा नमुनाही ‘निगेटिव्ह’ आला तर त्या रुग्णाला डिस्चार्ज द्यावा. त्याने घरी राहून किमान आठवडाभराची विश्रांती घ्यायचा सल्ला देण्यात यावा. समजा एखाद्या रुग्णाचा पहिला नमुना ‘पॉझिटिव्ह’ आला आणि दुसरा ‘निगेटिव्ह’ तर अशा रुग्णांवर रुग्णालयातच उपचार करावेत, असे कोरोनासाठी तपासणी केलेल्या रुग्णांच्या बाबतीत डिस्चार्ज धोरण सार्वजनिक आरोग्य विभागाने ठरविले आहे.
कोरोना व्हायरस आजाराच्या अनुषंगाने राज्य साथरोग नियंत्रण समितीची जी.टी. रुग्णालयातील सभागृहात सोमवारी बैठक घेण्यात आली. निरीक्षणाखाली रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्याबाबतचे धोरण ठरविण्यात आले. चीन आणि विशेषकरून वुआन प्रांतातून आलेल्या राज्यातील रहिवासी प्रवाशांना संपर्क करून प्रकृतीची विचारणा करणे आदींबाबत या वेळी चर्चा झाली. माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास आदी या वेळी उपस्थित होते. बैठकीस आरोग्य आयुक्त अनुपकुमार यादव, संचालक डॉ. अर्चना पाटील, डॉ. साधना तायडे, डॉ. प्रदीप आवटे, एनआयव्हीचे तज्ज्ञ आदी या वेळी उपस्थित होते.
चीन आणि विशेषकरून वुआन प्रांतातून जर कोणी प्रवासी १८ जानेवारीपूर्वी मुंबईत दाखल झाला असेल तर, अशा १ जानेवारीपासूनच्या प्रवाशांची यादी विमानतळ प्राधिकरणाकडून घेण्यात येईल. त्यातील महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या प्रवाशांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्यात येऊन त्यांच्यामध्ये सर्दी, ताप वा तत्सम लक्षणे आढळली आहेत का? किंवा कुटुंबातील सदस्यांना जाणवत आहे का, याबाबत विचारणा करावी, असा निर्णय या वेळी घेण्यात आला. महापालिका क्षेत्रातील अशा प्रवाशांशी महापालिकेचे आरोग्य अधिकारी संपर्क साधतील, तर ग्रामीण भागातील प्रवाशांना आरोग्य विभागाचे अधिकारी दूरध्वनीवरून संपर्क साधणार आहेत.
उपचारांकरिताही मार्गदर्शक तत्त्वे
ज्या रुग्णालयांचा समावेश ‘कोरोना’ रुग्णांच्या उपचारांसाठी आहे तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांना मास्क द्यावे, अशी सूचना या वेळी करण्यात आली. खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात येतील. या आजाराचे लक्षण आढळलेल्या रुग्णांवर काय उपचार करावेत याबाबत सूचना तज्ज्ञांमार्फत तयार करण्यात येत आहे. त्या लवकरच खासगी डॉक्टरांना पाठविण्याचा निर्णय या वेळी झाला.

मुंबई, पुण्यात विलगीकरण कक्ष
महाराष्ट्रात आजमितीस कोरोना व्हायरसचा धोका मोठ्या प्रमाणावर नाही. मात्र, आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्यास तोंड देण्यासाठी ‘कोरोना’ रुग्णांसाठी मुंबईत कस्तुरबा आणि पुणे येथे नायडू रुग्णालयात विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. आवश्यकता भासल्यास खासगी रुग्णालयांची यासाठी मदत घेण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.
मात्र खासगी रुग्णालय निवडीसाठी निकष तयार करण्यात येत असून त्यानुसार त्यांची निवड करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आल्याचे प्रधान सचिव डॉ. व्यास यांनी सांगितले.

२ हजार ६०० प्रवाशांची तपासणी, १०४ क्रमांकावर संपर्क साधा
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर १८ जानेवारीपासून थर्मल स्कॅनर यंत्रणा कार्यरत आहे. रविवारपर्यंत सुमारे २ हजार ६०० प्रवाशांची तपासणी त्याद्वारे करण्यात आली. ‘कोरोना’संदर्भात शंकांचे निरसन करण्यासाठी कॉल सेंटर सुरू करण्यात येणार असून, १०४ क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. सध्या प्रवाशांची तपासणी करताना चीनच्या वुआन प्रांतातून आलेल्या प्रवाशांवर लक्ष केंद्रित करण्यात यावे, असाही निर्णय या वेळी झाला.

दोघांच्या अहवालाची प्रतीक्षा
बाधित भागातून आलेल्यांपैकी १५ प्रवासी राज्यातील आहेत. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार त्यांची पुढील २८ दिवस दूरध्वनीवरून चौकशी होईल. या प्रवाशांपैकी पाच प्रवाशांना ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने विलगीकरण कक्षात भरती केले. तिघांचे प्रयोगशालेय नमुने एनआयव्ही पुणे येथे पाठविले होते, ते निगेटिव्ह आले. उर्वरित दोघांचे नमुने सोमवारी (आज) एनआयव्ही पुणे येथे पाठविले आहेत. पाचपैकी चार कस्तुरबा तर एक पुण्यातील नायडू रुग्णालयात दाखल आहे.

Web Title:  Re-examination of 'those' patients, Determination of corona discharge policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.