उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन, छायांकित प्रतीचे अर्ज प्रथमच ऑनलाइन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2019 04:42 AM2019-06-07T04:42:55+5:302019-06-07T06:43:12+5:30

ऑनलाइन अर्ज उन्हाळी सत्राच्या जास्त संख्या असलेल्या परीक्षेसाठी सध्या लागू केले आहेत.

Re-evaluation of the answer sheet, application for the first time for the first time | उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन, छायांकित प्रतीचे अर्ज प्रथमच ऑनलाइन

उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन, छायांकित प्रतीचे अर्ज प्रथमच ऑनलाइन

Next

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या २०१९ च्या उन्हाळी सत्राच्या परीक्षेचे निकाल विद्यापीठ जाहीर करीत आहे. निकालानंतर काही महत्त्वाच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन व छायांकित प्रतीचे अर्ज आजपासून ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत. ही सुविधा प्रथमच विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे. बी.कॉम सत्र ६ च्या चार विषयांच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन व छायांकित प्रतीचे अर्ज ऑनलाइन स्वीकारण्यात येत असून याची अखेरची तारीख १८ जून २०१९ आहे. याचे शुल्कही ऑनलाइनच स्वीकारण्यात येत आहे.

ऑनलाइन अर्ज उन्हाळी सत्राच्या जास्त संख्या असलेल्या परीक्षेसाठी सध्या लागू केले आहेत. २०१९ च्या हिवाळी सत्रापासून संपूर्ण परीक्षेचे पुनर्मूल्यांकन व छायांकित प्रतीचे अर्ज ऑनलाइन स्वीकारण्यात येतील. अर्ज www.mu.ac.in या मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर Exam & Resuls-Examination- Application for Revaluation / Photocopy या लिंकवर उपलब्ध आहेत.

पुनर्मूल्यांकन व छायांकित प्रतीचे अर्ज ऑनलाइन केल्यामुळे विद्यार्थी महाविद्यालयात न जाता, थेट ऑनलाइन अर्ज करू शकतो. यामुळे विद्यापीठाकडे हे अर्ज तत्काळ येतील व विद्यापीठ या अर्जावर प्रक्रिया करून पुनर्मूल्यांकन करण्यासाठी शिक्षकांसाठी ऑनलाइन ओएसएमद्वारे उपलब्ध केले जाईल. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी छायांकित प्रतीसाठी अर्ज केला असेल, त्या विद्यार्थ्याच्या ई-मेलवर त्याच्या उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत पाठिवली जाईल.

सध्या महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेतात व ते अर्ज एका सीडीमध्ये विद्यापीठाकडे पाठवतात, यामध्ये वेळ जातो. निकाल लागल्यापासून तो पेपर शिक्षकांना मूल्यांकनासाठी उपलब्ध करून देण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी जातो. तो कालावधी या ऑनलाइनमुळे पूर्णपणे कमी होणार आहे. तसेच महाविद्यालयाचा ताणही यामुळे कमी होणार आहे.

ऑनलाइन अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आपल्या महाविद्यालयाची निवड करावी व नंतर स्वत:चा परीक्षा क्रमांक टाकावा. परीक्षा क्रमांक टाकल्यानंतर विद्यार्थ्यांना या परीक्षेतील सर्व तपशील उपलब्ध होईल. ज्या पेपरचे पुनर्मूल्यांकन किंवा छायांकित प्रत यासाठी अर्ज करायचा आहे त्या पेपरची निवड करायची आहे. निवड केल्यानंतर तेवढी रक्कम दर्शविली जाईल. यानुसार ते शुल्क क्रेडिट/ डेबिट कार्ड / नेट बँकिंग / फोन पे व वॉलेटच्या माध्यमातून आॅनलाइन भरले जाईल. शुल्क भरल्यानंतर याची एक प्रत डाऊनलोड करून स्वत:कडे ठेवणे आवश्यक असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले.

उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन व छायाप्रत या ऑनलाइन अर्जाचे सॉफ्टवेअर विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील संगणक विभागाने तयार केलेले असून सिनिअर सिस्टीम प्रोग्रॅमर मनीषा संसारे यांनी हा ऑनलाइन पुनर्मूल्यांकनाचा प्रोग्रॉम तयार केलेला आहे. हा इनहाउस प्रोग्रॉम तयार करताना परीक्षा विभागाचे संचालक डॉ. विनोद पाटील व पुनर्मूल्यांकन विभागाचे उपकुलसचिव हिंमत चौधरी यांनीही साहाय्य केले आहे.

इतरही सुविधा उपलब्ध करून देणार
विद्यार्थ्यांसाठी पुनर्मूल्यांकन व छायांकित प्रत ऑनलाइन उपलब्ध करून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. इतरही सुविधा विद्यार्थ्यांसाठी लवकर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. - डॉ. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

Web Title: Re-evaluation of the answer sheet, application for the first time for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.