Join us
Daily Top 2Weekly Top 5

रतन टाटांचा एक आदेश अन् 'ताज हॉटेल'मध्ये भटका कुत्रा निवांत झोप घेतो तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 18:34 IST

टाटा यांच्या मालकीच्या मुंबईतील 'ताज' या फाइव्ह स्टार हॉटेलच्या दरवाजासमोरच एक भटका कुत्रा निवांत झोपला होता.

मुंबई

आपण समाजाचं देणं लागतो, याची प्रचिती ज्यांच्या प्रत्येक कृतीतून येते असे उद्योगपती रतन टाटा यांच्या आणखी एका कृतीनं अनेकांचं मन पुन्हा जिंकलं आहे. टाटा यांच्या मालकीच्या मुंबईतील 'ताज' या फाइव्ह स्टार हॉटेलच्या दरवाजासमोरच एक भटका कुत्रा निवांत झोपला होता. त्याचा फोटो हॉटेलात वास्तव्याला असलेल्या रुबी खान यांनी टिपला आणि सोशल मीडियात पोस्ट केला. सोबत या फोटोमागची कहाणी देखील सांगितली आहे. 

भटक्या कुत्र्याला हटकू नका, त्याला हवं तिथं झोपू द्या, हॉटेलच्या आवारात जर असे मुके प्राणी स्वत:हून येत असतील आणि झोपत असतील तर त्यांना जाणूनबुजून हटकू नका, असे निर्देश खुद्द रतन टाटा यांनी दिल्याचं हॉटेलच्या स्टाफनं सांगितल्याचं रुबी खान यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. त्यामुळेच हॉटेलच्या दारात झोपलेल्या त्या कुत्र्याला कुणी हटकत नाही, असं हॉटेलच्या स्टाफनं रुबी खान यांना सांगितलं. याच मन जिंकणाऱ्या कृतीचं कौतुक करण्यासाठी रुबी खान यांनी पोस्ट लिहून याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवली. रुबी खान एका कॉर्पोरेट कंपनीत उच्च पदावर नोकरीला आहेत. त्यांनी केलेल्या पोस्टवर ताज हॉटेलनंही प्रतिक्रिया देत रुबी खान यांचे आभार व्यक्त केले आहेत. 

रुबी खान आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, "ताज हॉटेल अनेक राजकीय प्रतिष्ठित व्यक्तींपासून ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींपर्यंत असंख्य उच्चपदस्थांसाठीची पहिली पसंती असते. त्यामुळे हॉटेलचा परिसर अगदी टापटीप आणि प्रतिमा जपणारा ठेवावा लागतो. याच हॉटेलच्या प्रवेशद्वारालाही खूप महत्व आहे. त्याच प्रवेशद्वारावर एक कुत्रा शांतपणे झोपला होता, कदाचित हे अनेकांना लक्षातही आलं नसेल. पण न राहून मी हॉटेलच्या स्टाफकडे सहज चौकशी केली आणि त्यांनी सांगितलं की रतन टाटा यांनी तसे निर्देश दिले आहेत की कोणताही मुका प्राणी जर हॉटेलच्या आवारात असेल तर त्याला हटकू नका. त्यांनाही भावना आहेत"

रुबी खान यांची संपूर्ण पोस्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रतन टाटा समाजकार्यात तर आघाडीवर असतातच. पण ते प्राणीप्रेमी म्हणूनही ओळखले जातात. त्यांना कुत्र्यांबद्दल विशेष प्रेम आहे. सोशल मीडियावर त्यांनी याआधी कुत्र्यांसोबतचे अनेक फोटोही पोस्ट केले आहेत. त्याचीच प्रचिती रुबी यांना ताज हॉटेलच्या आवारातील या घटनेनं आली. ज्याचं सोशल मीडियातही कौतुक केलं जात आहे. 

विशेष म्हणजे, रुबी यांच्या पोस्टवर ताज हॉटेलनंही अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. "नमस्कार रुबी, ही माहिती शेअर केल्याबद्दल धन्यवाद. ताजमध्ये, प्रत्येक पाहुण्याला ताज हे त्याचं घर वाटेल याची खात्री करतो. आम्ही सहानुभूती आणि सर्वसमावेशाला महत्त्व देतो. तुमचे विचारही खरोखरच आमच्या मूळ मूल्यांशी जुळणारे आहेत.

टॅग्स :रतन टाटामुंबई