Join us  

मंत्रालयात उंदीर महाघोटाळा! एका आठवड्यात मारले ३ लाख १९ हजार ४०० उंदीर ! एका मिनिटात ३२ उंदीर !!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 8:51 PM

महाराष्ट्राच्या मंत्रालयात एक मोठा विश्वविक्रम झाला आहे. आजवर कुणी केला नसेल. यापुढेही कदाचित होणार नाही. मंत्रालयात ३ लाख १९ हजार ४०० उंदीर मारले गेले आहेत...आणि तेही फक्त एका आठवड्यात!

मुंबई: मंत्रालयात एका आठवड्यात तब्बल ३ लाख १९ हजार ४०० उंदीर मारले गेले आहेत. म्हणजे दिवसाला ४७ हजार उंदीर मारण्यात आले. पुढे जाऊन आकडेमोड केली तर तासाला १ हजार ९५८ उंदीर मारण्यात आले. म्हणजेच मिनिटाला ३१-३२ उंदरांना ठार मारण्यात आले. डोके गरगरवणारी ही आकडेवारी येथेच थांबत नाही. मारलेल्या या उंदरांचे वजन 9125.71 किलो इतके होते. मग त्यांचे केले तरी काय....आज ही उंदीरमारीची आकडेवारी मांडली गेली ती विधानसभेत. ती मांडत भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाख खडसे यांनी मंत्रालयात उंदीर मारण्यात घोटाळा झाल्याचा आरोप केला.नाथाभाऊंचे भाषण तसे नेहमीच रंगते. त्यात ते आक्रमकतेनं तिरकस शैलीत बोलू लागले की जरा जास्तच. सध्या त्यांच्या उपेक्षेची नाराजी त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत असते. आज त्यांना मंत्रालयातील उंदीरमारीचा विषय मिळाला. आकडेवारी मांडत मंत्रालयात उंदीर मारण्यात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला. एवढ्यावरच ते थांबले नाहीत धुळ्यातील शेतकरी धर्मा पाटील यांनी आत्महत्या केली ते विषही मंत्रालयातील उंदीर मारण्याचेच होते असे सांगून त्यांनी खळबळ माजवली.

मंत्रालयात उंदरांचा सुळसुळाट झाल्याने एका कंपनीला उंदीर मारण्याचे कंत्राट देण्यात आले. त्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी ठरवण्यात आला. पुढे हा कालावधी कमी करुन दोन महिन्यांचा करण्यात आला. मात्र कंत्राटदार कंपनीची कमाल अशी की त्यांनी अवघ्या आठवडाभरातच 3 लाख 19 हजार 400 उंदीरांना मारल्याचा दावा केला. मात्र मुळात त्या कंपनीकडे मंत्रालयात उंदीर मारण्यासाठी विष आणण्यासाठी सामान्य प्रशासन विभाग आणि गृहविभागाची परवानगी असल्याचे कागदपत्रांवरुन दिसत नसल्याचा आरोपही खडसे यांनी केला. तसेच प्रत्येक दिवसाला ४६ हजार उंदीर मारण्यात आले. त्यांचे वजन 9125.71 किलो इतके होते. त्यांची विल्हेवाट लावली तरी कुठे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मुंबई महापालिकेने गेल्या दोन वर्षात संपूर्ण मुंबईत सहा लाख उंदीर मारले आहेत. त्या आकडेवारीशी तुलना केली तर मंत्रालयात उंदीर मारल्याचा विक्रम करण्यात आला आहे. तो केल्याबद्दल भ्रष्ट अधिकाऱ्यांना पारितोषिक देणार का असा सवालही खडसे यांनी विचारला. 

टॅग्स :मंत्रालयएकनाथ खडसेभाजपा