Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनासाठी राज्यात होणार ‘रॅपिड टेस्ट’; रोगप्रतिकार शक्ती, अ‍ॅन्टीबॉडीज तपासणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 06:44 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सींगमध्ये यास मान्यता देण्यात आल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

- अतुल कुलकर्णी मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने बाधित किंवा संशयीत रुग्णांना ओळखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रॅपीड टेस्ट (समूह तपासण्या) करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यासाठी आता एका पोर्टेबल मशीनच्या सहाय्याने ज्या प्रमाणे आपण रक्तातील साखरेचे प्रमाण तपासतो त्याचप्रमाणे ही तपासणी केली जाईल. त्यानंतर संबंधीतास कोरोनाची पुढील तपासणी करण्याची किंवा आयसोलेशन व क्वारंटाईन करण्याची गरज आहे की नाही, हे देखील स्पष्ट होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सींगमध्ये यास मान्यता देण्यात आल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. मुंबईत अनेक भाग मोठ्या प्रमाणावर बंद करण्यात आले आहेत. ते भाग दाट लोकसंख्येचे आहेत. अशा ठिकाणी कोरोनाची तपासणी करण्यासाठीचे सॅम्पल घेणे, त्याचा अहवाल येणे यात वेळ जाऊ शकतो त्यामुळे या साथीवर नियंत्रण आणणे कठीण होईल म्हणून ही रॅपीड टेस्ट करावी, असा आग्रह राज्य सरकारने धरला होता. आम्ही या तपासण्या खाजगी लॅबच्या माध्यमातूनही करुन घेऊ शकतो, असे टोपे यांनी सांगितले.

मोठ्या समूहाच्या ठिकाणी अशा तपासण्या केल्या तर कोणाच्या शरीरात किती अ‍ॅन्टीबॉडीज तयार झाल्या आहेत हे तात्काळ कळेल व त्यातून रुग्ण ओळखण्यास वेगाने मदत होईल. तसेच कोणाला क्वारंटाईन करायचे व कोणाला आयसोलेशनमध्ये न्यायचे हे देखील त्यातून स्पष्ट होई टोपे म्हणाले.

निजामुद्दीन प्रकरणातील १३०० लोक क्वारंटाईनमध्ये

दिल्लीत झालेल्या निजामुद्दीन तब्लीक जमातचे १४०० लोक महाराष्ट्रात आल्याची माहिती केंद्र सरकारने आम्हाला दिली होती.आम्ही महसूल विभागाचे अधिकरी आणि पोलिसांच्या माध्यमातून त्यातील १३०० लोकांना ताब्यात घेतले असून ते विविध शहरात क्वारंटाईन केले आहेत. त्यांच्या स्वॅबचे सॅम्पलही आम्ही घेतले असून ते तपासण्यासाठी देण्यात आले आहेत, अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली.

काय आहे ही तपासणी?

याबद्दल वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी ‘लोकमत’ला सांगितले, शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ‘आयजीजी आयजीएम’ नावाच्या अ‍ॅन्टीबॉडीज प्रत्येकाच्या शरीरात तयार होत असतात. प्रत्येक आजारासाठी विशिष्ट अ‍ॅन्टीबॉडीज असतात. शरीरातील प्रतिकारशक्तीचे व आजाराच्या अस्तित्वाचे ते मापक असतात.

संबंधीत बाधीत रुग्णांच्या शरीरात जर विशिष्ट आजाराच्या अ‍ॅन्टीबॉडीज वाढल्या असतील तर त्याच्या प्रतिकारशक्तीचा अंदाज येतो. त्यातून एखाद्याच्या शरीरात खूपच अ‍ॅन्टीबॉडीज वाढल्या असतील तर त्याची कोरोनाचीही तपासणी करता येते असेही डॉ. लहाने म्हणाले.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसराजेश टोपे