Join us  

रणजितसिंह भाजपात जाणार, मात्र विजयसिंह राष्ट्रवादीत राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 2:48 PM

राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती मात्र विजयसिंह मोहिते पाटील भाजपात जाणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

यदू जोशी

मुंबई - माढा लोकसभा मतदारसंघाला घेऊन राज्यात युती आणि आघाडी यांच्यात संघर्ष सुरुच आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती मात्र विजयसिंह मोहिते पाटील भाजपात जाणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते हे उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. उद्या मंत्रालयासमोरील महिला सभागृहात रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. मात्र रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपने उमेदवारी देण्याचं आश्वासन दिलेलं नाही असं देखील समजतंय.  

काही दिवसांपूर्वी रणजितसिंह मोहिते-पाटलांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली होती. त्यावेळी ते भाजपात प्रवेश करतील, अशी अटकळ बांधली जात होती. माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील घराण्याची असलेली ताकद पाहता भारतीय जनता पार्टीकडून मोहितेंना गळाला लावण्याचा प्रयत्न केला जात होता. त्याच पार्श्वभूमीवर रणजितसिंह मोहिते पाटील यांचा प्रवेश महत्त्वपूर्ण मानला जात आहे.  

माढा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. हा बालेकिल्ला बांधण्यात मोहिते-पाटील कुटुंबाचा खूप मोठा वाटा आहे. माढ्यातील कार्यकर्त्यांची फळी अतिशय मजबूत असल्यानंच गेल्या निवडणुकीत मोदी लाट असतानाही विजयसिंह मोहिते-पाटील यांनी माढ्याचा गड राखला होता. मात्र यंदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं प्रसिद्ध केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या दोन याद्यांमध्ये मोहिते-पाटील यांच्या नावाचा अजूनही समावेश करण्यात आला नाही. त्यामुळेच विजयसिंह मोहिते-पाटील राष्ट्रवादी सोडणार अशा चर्चांना उधाण आले होते.  

टॅग्स :लोकसभा निवडणूकविजयसिंह मोहिते-पाटीलराष्ट्रवादी काँग्रेसभाजपा