Join us
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयातून पळाली, विकृतांमध्ये अडकली; आश्रमातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2022 06:39 IST

माटुंगा येथील महिला आश्रमातील ४५ वर्षीय केअर टेकर महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई : मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे माटुंगा येथील महिला आश्रमातील १५ वर्षीय मुलीला नायर रुग्णालयात दाखल केले. तेथून कुणालाही काही न सांगता मुलगी निघून गेली. पुढे विकृतांच्या जाळ्यात अडकली आणि दोघांनी तिच्यावर लैगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. याप्रकरणी एमआरए मार्ग पोलिसांनी दोघांविरोधात पोक्सो, लैगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, त्यांचा शोध सुरू आहे.

माटुंगा येथील महिला आश्रमातील ४५ वर्षीय केअर टेकर महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. डोंगरीच्या बाल कल्याण समितीकडून महिला आश्रमात दाखल केलेल्या १५ वर्षीय मुलीची मानसिक स्थिती बिघडल्याने तिला १४ जुलै रोजी नायर रुग्णालयात दाखल केले. २१ ऑक्टोबर रोजी ती सकाळी ९ वाजता रुग्णालयातून निघून गेली. ही बाब समजताच रुग्णालयात खळबळ उडाली. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून ती सीएसएमटी स्थानकाच्या दिशेने निघून जाताना दिसली.

तेथे सोनू व राजेंद्र नावाच्या व्यक्तीनी तिची मानसिक स्थिती ठीक नसल्याचा फायदा घेत तिला सोबत पळवून नेले. सीएसएमटी परिसरातील एका लॉजवर नेऊन तिच्यावर लैगिक अत्याचार केला. तेथून सुटका करत तरुणी पुन्हा परतताच हा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा पुढील तपासासाठी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. त्यानुसार, पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :गुन्हेगारी