Join us  

"... ती त्यांची मर्यादा होती, सावरकरांच्या राष्ट्रभक्तीविषयी शंका घेणे योग्य नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 5:20 AM

श्रीपाल सबनीस : राज्यपालांना परत पाठवावे

लाेकमत न्यूज नेटवर्कडाेंबिवली : रामदेवबाबा कितीही माेठे योगगुरू असले तरी त्यांनी महिलांबाबत केलेले विधान निंदनीय आहे.  महिलांनी कोणते कपडे वापरावे, याबाबतचे संपूर्ण स्वातंत्र्य त्यांना भारतीय संविधानाने दिलेले आहे. रामदेवबाबांसारख्या ब्रह्मचारी माणसाला हे वक्तव्य शोभत नाही. त्यांचे हे वक्तव्य म्हणजे त्यांच्या ब्रह्मचर्याला डाग असल्याचे मत ज्येष्ठ विचारवंत डाॅ. श्रीपाल सबनीस यांनी येथे व्यक्त केले.

स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे शनिवारी संविधान दिनानिमित्त संविधान प्रबाेधन सभा घेण्यात आली. याप्रसंगी डाॅ. सबनीस बोलत होते. या सभेचे आयाेजक लक्ष्मण अंभाेरे, नितीन अहिरे, नंदिनी शेळके, जान्हवी झा आदी मान्यवर उपस्थित हाेते. डाॅ. सबनीस म्हणाले की, स्वायत्त संस्था असलेल्या केंद्रीय तपास यंत्रणा (सीबीआय), अंमलबजावणी संचालनालय (ईडी) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यामधील सरकारचा वाढता हस्तक्षेप लोकशाहीसाठी मारक आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे, तर भारताचे दैवत आहेत. त्यांच्याबद्दल  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेले वक्तव्य हा महाराष्ट्र मराठी संस्कृतीचा अपमान आहे. ज्यांना महाराष्ट्राबद्दल आपुलकी नाही, अशांना पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात का पाठवितात?  पंतप्रधानांनी परत बोलावणे योग्य ठरेल.

‘स्वातंत्र्यवीरांच्या मर्यादेचे भांडवल करू नका’स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या राष्ट्रभक्तीविषयी  संशय व्यक्त करणे योग्य नाही. त्यांनी  भोगलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेदरम्यानच्या मरणप्राय यातना टाळण्यासाठी त्यांनी जर माफी मागितली असेल, तर ती त्या माणसाची मर्यादा आहे. स्वातंत्र्यवीरांच्या मर्यादेचे भांडवल राजकीय स्वार्थासाठी करू नका. राजकीय संस्कृतीच्या मारामाऱ्यांमध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी शिवाजी महाराज आणि सावरकरांना वापरणे त्यांचे भांडवल करणे  योग्य नाही. संविधानाने बोलण्याचे स्वातंत्र्य दिले असले, तरी महापुरुषांना बदनाम करण्यासाठी त्याचा वापर करू नका, असे मत डाॅ. सबनीस यांनी यावेळी व्यक्त केले.

टॅग्स :विनायक दामोदर सावरकरश्रीपाल सबनीसरामदेव बाबाछत्रपती शिवाजी महाराज