Join us

रामदास कदम-गजानन कीर्तिकर वाद मिटला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मध्यस्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2023 08:12 IST

गजानन कीर्तिकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून गद्दारीचे दाखले दिल्यानंतर रामदास कदम यांनीही थेट कीर्तिकर यांचे खासगी आयुष्यच काढून बदनामीचा प्रयत्न केला.

मुंबई : एकमेकांचे खासगी आयुष्य काढण्यापर्यंत विकोपाला गेलेला शिवसेना गटाचे नेते रामदास कदम खासदार गजानन कीर्तिकर यांच्यातील वादावर अखेर पडदा पडला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या दोन्ही नेत्यांनी भेट घेतल्यानंतर या दोन्ही नेत्यांनी आपल्या वाणीला विराम दिला आहे. रामदास कदम आरोप करतात म्हणून मी प्रत्युत्तर देणार नाही. या प्रकरणावर माझ्याकडून पडदा टाकण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया कीर्तिकरांनी दिलीय तर रामदास कदम यांनीही मी जाभाऊंना दिवाळीच्या शुभेच्छा देतो, शंभर टक्के वाद मिटला आहे, असे विधान केले आहे. 

गजानन कीर्तिकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून गद्दारीचे दाखले दिल्यानंतर रामदास कदम यांनीही थेट कीर्तिकर यांचे खासगी आयुष्यच काढून बदनामीचा प्रयत्न केला. त्यांच्या अखेर यामुळे पक्षातील भांडणेच चव्हाट्यावर येत असल्याने खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनीच यात मध्यस्थी केली. दोघांनाही वर्षा निवासस्थानी पाचारण केले. कीर्तिकर यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तर कदमांनी बुधवारी पाडव्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्र्यांची भेट घेत वाद मिटल्याचे जाहीर केले.

उत्तर-पश्चिम मतदारसंघावरचा दावा कदमांनी सोडला

मला राजकारणातून संपवण्यासाठी प्रेसनोट काढणे कितपत योग्य आहे? तेव्हा गजाभाऊंनी तुमच्याकडे यावे, थेट माध्यमांकडे जाऊ नये अशा सूचना द्याव्यात, असे मुख्यमंत्र्यांना सांगितलेय. भविष्यात आमच्यात राजकीय वाद होणार नाहीत. मी गजाभाऊंना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. शंभर टक्के वाद मिटला आहे. याच नाही तर इतर मुद्द्यावरदेखील मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. उत्तर- पश्चिम मतदारसंघात कीर्तिकर खासदार आहेत. त्यामुळे तेच निवडणूक लढवतील. मला यात कसलीही आपत्ती नाही, असे सांगत रामदास कदम यांनी मतदारसंघावरचा दावा मागे घेतला.

मी प्रत्युत्तर देणार नाही

कीर्तिकर रामदास कदम आरोप करतात म्हणून मी प्रत्युत्तर देणार नाही. या प्रकरणावर माझ्याकडून पडदा टाकण्यात आला आहे. मी माझ्या भावना मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्या आहेत. आम्हीच भांडत बसलो तर शिवसैनिकांपर्यंत चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे त्यांनी कितीही टीका केली तरी मी कुठलंही भाष्य करणार नाही. तसा शब्द मी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

टॅग्स :रामदास कदमगजानन कीर्तीकरएकनाथ शिंदे