Ramdas Eighth adopts Bibtaya in National Park | रामदास आठवलेंनी नॅशनल पार्कमधील बिबट्याला घेतलं दत्तक
रामदास आठवलेंनी नॅशनल पार्कमधील बिबट्याला घेतलं दत्तक

मुंबई : ‘तुमचे जीवन होईल मंगल, जर तुम्ही वाचविले जंगल’ अशी चारोळी करून वन्यजीवांचे व पर्यावरणाचे रक्षण करा, त्यासाठी वृक्षारोपण करा. प्रत्येक माणसाने आपल्या आयुष्यात किमान दहा झाडे तरी लावावीत, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

बोरीवली पूर्वेकडील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रामदास आठवले यांनी दीड वर्षाचा बिबट्या दत्तक घेण्याचा कार्यक्रम गुरुवारी पार पडला. रामदास आठवले यांचे सुपुत्र जीत आठवले यांच्या आग्रहास्तव बिबट्या दत्तक घेण्यात आला असून जीत याने या बिबट्याचे नामकरण ‘सिम्बा’ असे केले. या वेळी रामदास आठवले बोलत होते.

याआधी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ‘भीम’ नावाचा पँथर दत्तक घेतला होता. त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्यानंतर वन विभागाविरुद्ध आरपीआयतर्फे आंदोलन छेडण्यात आले होते. वन्य प्राणी दत्तक योजनेत दत्तक घेतलेल्या बिबट्याच्या सांभाळासाठी वार्षिक एक लाख २० हजार रुपये शुल्काचा धनादेश रामदास आठवले यांनी उद्यान प्रशासनाकडे सुपुर्द केला.

या वेळी बौद्ध भन्ते शांतीरत्न यांनी बौद्ध धम्मातील मंगल गाथेद्वारे वन्य प्राण्याच्या आरोग्य व संरक्षणासाठी प्रार्थना केली. याप्रसंगी सीमा आठवले, शकुंतला आठवले, शीला गांगुर्डे, पोपटशेठ घनवट, दिलीप व्हावळे आणि रिपाइंचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Ramdas Eighth adopts Bibtaya in National Park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.