Ram Krishna Hari ... The secret of CM visit by Indurikar Maharaj of sangamner | राम कृष्ण हरी... इंदुरीकर महाराजांनी उलगडलं CM भेटीचं रहस्य
राम कृष्ण हरी... इंदुरीकर महाराजांनी उलगडलं CM भेटीचं रहस्य

ठळक मुद्देइंदुरीकर महाराजांची ही भेट राज्यभर चर्चेचा विषय ठरलीडोक्यावर टोपी, कपाळी गंद आणि पांढरा नेहरू कुर्ता परिधान केलेल्या महाराजांचे मुख्यमंत्र्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत

मुंबई - सुप्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी महाजनादेश यात्रेत व्यासपीठावर सहभागी होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या. आपल्या किर्तनातून जनप्रबोधन करणाऱ्या आणि तरुणांना राजकारणापासून दूर राहणाऱ्या इंदुरीकर महाराजांना भाजपाच्या व्यासपीठावर पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तसेच, सोशल मीडियावरही इंदुरीकर महाराजांचे मुख्यमंत्र्यांसोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत. नेटीझन्सने इंदुरीकरांना चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर, इंदुरीकर महाराजांनी स्वत: स्टेजवरील भेटीचं रहस्य उलगडलं. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेतील तिसऱ्या टप्प्याला शुक्रवारपासून सुरुवात झाली. या यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यात अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यांचा समावेश आहे. भाजपात सध्या मेगा भरती सुरू असून साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसेल यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. त्यातच, संगमनेरमधील महाजनादेश यात्रेच्या व्यासपीठावर चक्क निवृत्ती महाराज इंदूरीकर पाहायला मिळाले. आपल्या भाषणापूर्वी मुख्यमंत्र्यांनी पुष्पगुच्छ देऊन महाराजांचे स्वागत केले. तसेच, महाराजांसोबत चर्चाही केली आहे. विशेष म्हणजे या महाजनादेश यात्रेला महाराज उपस्थित राहिले, पण भाजपा प्रवेश केल्याची किंवा आपली कुठलिही राजकीय भूमिका इंदुरीकर यांनी जाहीर केली नाही. 

इंदुरीकर महाराजांची ही भेट राज्यभर चर्चेचा विषय ठरली. तसेच, अनेकांनी लवकरच महाराज भाजपात प्रवेश करतील, तर काहींनी चक्क बाळासाहेब थोरातांविरुद्ध निवडणूक लढवतील, अशाही अफवा पसरवल्या. मात्र, या भेटीबद्दल स्वत: इंदुरीकर महाराजांनी खुलासा केला आहे. मी सामाजिक कार्यासाठी आग्रही असतो. मला माझ्या दैनंदिन कार्यक्रमातून वेळ मिळत नाही. त्यामुळे संगमनेर येथील मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात हजेरी लावून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 1 लाख रुपयांचा धनादेश देण्यास मी व्यासपीठावर गेलो होतो. त्यावेळी, मी कुठल्याही पक्षाची मफलर गळ्यात घातली नाही. मला निवडणुकीत उतरायचे असते, तर मी पक्षाचा गमजा घातला असता, कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत तेथे थांबलो असतो. मात्र, मी धनादेश दिल्यानंतर लगेचच तेथून निघुन गेलो, असे स्पष्टीकरण महाराजांनी दिले आहे. त्यामुळे इंदुरीकर महाराजांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. 

दरम्यान, डोक्यावर टोपी, कपाळी गंद आणि पांढरा नेहरू कुर्ता परिधान केलेल्या महाराजांचे मुख्यमंत्र्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर, भाजप समर्थकांकडूनही हे फोटो जाणीवपूर्वक व्हायरल करण्यात येत असून इंदुरीकर महाराजांनी भाजपाला शुभेच्छा दिल्याचे मेसेजही या फोटोसोबत लिहिले जात आहेत. 


Web Title: Ram Krishna Hari ... The secret of CM visit by Indurikar Maharaj of sangamner
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.