मुंबई
एकनिष्ठ म्हणून इतके दिवस थांबले. पण कुणी कुरघोडीचे राजकारण करत असेल तर तिथे राहण्यापेक्षा त्यांच्याशी दुश्मनी घेऊ, असे आव्हान शिंदेसेनेत प्रवेश केलेल्या माजी नगरसेविका राजुल पटेल यांनी उद्धवसेनेचे आमदार अनिल परब यांना दिले.
पक्षांतरानंतर पटेल यांनी वर्सोवा शाखेला टाळे लावले. त्यामुळे आक्रमक झालेल्या उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांनी टाळे फोडून शाखा ताब्यात घेतली. यावरुन दोन्ही सेना आमने-सामने आल्या आहेत. आमदार परब यांनी, मी मार खाऊन शाखा वाचवली आणि पटेल यांच्या ताब्यात दिली होती, असे म्हटले. त्यावर पटेल यांनी, २००० साली कारवाई झाली तेव्हा ती मी सांभाळली. त्यावेळी परब कुठे होते?, असा सवाल केला.
पक्षात थांबून चूक केलीउद्धवसेनेचे नगरसेवक राजू पेडणेकर यांच्याशी माझा तात्त्विक वाद होता. नेतृत्वाने तो वाद मिटवला नाही. त्या आगीत तेल ओतायचे काम काहींनी केले. हारुन खान यांना उमेदवारी देत नेतृत्वाने एका दगडात दोन पक्षी मारली आणि पक्षात थांबून चूक केली, याची जाणीव झाली. एकनाथ शिंदे यांनी अनेकदा येण्यास सांगितले होते. पण शिंदेसेनेत प्रवेश करायला खूप उशीर केला, असे वाटते, असे पटेल म्हणाल्या.
खरे कारण माहित आहे...पटेल माझ्यासोबत महिला विभागप्रमुख होत्या. त्या कुणाच्या दबावाखाली आल्या आणि त्यांना कुणी वाईट वागणूक दिली, हे मला मान्य नाही. त्या कोणाचे ऐकून घेणाऱ्या नाहीत. पण पक्ष सोडताना काही कारणे द्यावी लागतात, त्यासाठी हे कारण दिले असावे, पण खरे कारण मला माहित आहे, असा टोला आमदार अनिल परब यांनी त्यांना लगावला.