Join us  

राजू शेट्टींनी पुन्हा घेतली राज ठाकरेंची भेट; निवडणुकीत एकत्र येण्यावर झाली चर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2019 1:19 PM

आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली असल्याची माहिती आहे. भाजपाला हरविण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावं अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे

मुंबई - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची दादर येथील कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. जवळपास एक तासांहून अधिक वेळ या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर हेदेखील उपस्थित होते. 

या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली असल्याची माहिती आहे. भाजपाला हरविण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावं अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मनसे-स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीसोबत राहणार की राज्यात नवीन समीकरण तयार होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असताना राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला वंचित बहुजन आघाडीमुळे लोकसभेत फटका बसला. त्यामुळे विधानसभेत वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या सोबतीला जाऊन बसलेले राजू शेट्टी यांनी विधानसभेला स्वाभिमानी शेतकरी संघटना 49 जागा लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पुण्यात दोन दिवसीय कार्यकारणीची बैठक झाली त्यात हा ठराव पारित केला आहे. 

लोकसभा निवडणुकीत काँग्रस-राष्ट्रवादी आघाडीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दोन जागा सोडल्या होत्या. सांगली आणि हातकंणगले लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानीसाठी सोडण्यात आले मात्र या दोन्ही मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पराभवाचा सामना सहन करावा लागला. खुद्द राजू शेट्टी यांनी हातकंणगलेमध्ये पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे विधानसभेची रणनीती ठरविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 49 जागांवर तयारी सुरु केल्याचं सांगण्यात येत आहे. 

तर मनसेने यंदाची लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. मात्र राज ठाकरे यांच्या प्रचाराने निवडणुकीचं वातावरण ढवळून निघालं होतं. लाव रे तो व्हिडीओ या राज ठाकरेंच्या स्टाईलने भाजपाची कोंडी केली होती. निवडणुकीच्या निकालात राज ठाकरेंच्या भाषणाचा परिणाम जाणवला नसला तरी विधानसभा निवडणुकीत मनसेची भूमिका काय असेल हे पाहणे गरजेचे असणार आहे. राजू शेट्टी आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याने राज्यात नवा फॉर्म्युला तयार होणार का हेदेखील काही काळात स्पष्ट होईल. कारण लोकसभा निकालानंतरची राजू शेट्टी आणि राज ठाकरे यांची ही दुसरी भेट आहे.  

टॅग्स :मनसेराजू शेट्टीराज ठाकरेनिवडणूक