Join us  

'कडकनाथ' कोपणार?; राजू शेट्टींची थेट 'ईडी'कडे तक्रार, सदाभाऊ खोत 'टार्गेट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2019 3:12 PM

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत पहिल्यापासूनच कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात.

मुंबई: कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायाचे आमीष दाखवून शेतकऱ्यांना सुमारे चार कोटींची फसवणूक करणाऱ्या महारयत अ‍ॅग्रो कंपनीच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचप्रमाणे  महारयत अ‍ॅग्रो कंपनी कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नातेवाईकांची असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला होता. त्यातच आता राजू शेट्टी यांनी ईडी कार्यालयात जाऊन कडकनाथ घोटाळा प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केल्याचे समोर आले आहे.

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत पहिल्यापासूनच कट्टर  प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात. त्यातच  ‘कडकनाथ कोंबडी पालन’ व्यवसायात गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ‘महारयत अ‍ॅग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’ने राज्यभरातील शेतकऱ्यांची मोठय़ा प्रमाणावर फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आल्याने राजू शेट्टी यांनी ही कंपनी सदाभाऊ खोत यांच्या जावयाच्या नावावर असल्याचा निशाना साधत आरोपीवर गुन्हा दाखल करण्याचे वक्तव्य शेट्टी यांनी केले होते. त्यानंतर शेट्टींनी आज (शुक्रवार) ईडी कार्यालयात जाऊन  कडकनाथ कोंबडी फसवणूकप्रकरणी लेखी तक्रार देत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

तसेच राजू शेट्टींच्या या आरोपावर सदाभाऊ खोत यांनी महारयत अ‍ॅग्रो कंपनीत आपले व कुुटुंबीयांचे नाव असल्यास राजकीय संन्यास घेऊन, प्रसंगी भर चौकात फाशीही घेऊ; परंतु  शेट्टी यांनी आरोप सिद्ध न केल्यास ते काय प्रायश्चित्त घेणार, हे सांगावे, असा टोलाही खोत यांनी लगावला होता.

‘कडकनाथ’ कोंबडी पालन व्यवसायप्रकरणी इस्लामपूर येथील महारयत अ‍ॅग्रो लि. कंपनीच्या संचालकांविरोधात शेतकऱ्यांची सुमारे तीन कोटी ९४ लाख ५९ हजार ९३० रुपये फसवणूक केल्याबद्दल शाहूपुरी पोलीस ठाण्यात संशयित सुधीर शंकर मोहिते, संदीप सुभाष मोहिते (दोघे रा. इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) व इतर संचालकांवर गुन्हा दाखल झाला होता. तसेच यातील संदीप सुभाष मोहितेला येथील न्यायालयाने ४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, यातील हणमंत शंकर जगदाळे (रा. अंबक चिंचणी, ता. कडेगाव) या संशयितास पोलिसांनी रविवारी अटक करण्यात आली होती. 

टॅग्स :अंमलबजावणी संचालनालयराजू शेट्टीसदाभाउ खोत कोल्हापूर